दरोडेखोरांचा धुमाकूळ; बाप-लेकाच्या गळ्याला चाकू लावून घरातील महिलांचे दागिने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:45 IST2025-05-22T14:41:21+5:302025-05-22T14:45:02+5:30
पहिल्या तीन घरांत शिरता न आल्याने चौथ्या घराचे गेट तोडून कोयत्याच्या धाकाने लूटमार; सातारा परिसरात ‘ऑन द स्पॉट’ रेकी करून दरोडेखोरांचा धुमाकूळ

दरोडेखोरांचा धुमाकूळ; बाप-लेकाच्या गळ्याला चाकू लावून घरातील महिलांचे दागिने लुटले
छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांचा धाक संपल्याचा प्रत्यय शहरवासीयांना दररोज येऊ लागला आहे. ६ दरोडेखोरांनी फावड्याचा दांडा, लोखंडी कटोनी, चाकू बाप-लेकाच्या गळ्याला लावून घरातील महिलांच्या अंगावरील १ लाख ५० हजार रुपयांचे दागिने लुटले. ही घटना सातारा परिसरातील अलोकनगरमधील पवार वस्ती येथे दि. २० मे रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज धाडसी चोरी, दरोड्याच्या घटना घडत आहेत. वाळूज, पंढरपूर भागातील घटना ताज्याच असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांनी सातारा परिसरातील अलोकनगर भागाला लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू असताना ६ दरोडेखोरांनी मंकी कॅप घालून हातात कोयता, चाकू, तलवार, टॉमीसारखे शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातला. अलोकनगरमधील औरिया व्हिलेजिया सोसायटीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत किरण जोशी यांच्या घराला दरोडेखोरांनी लक्ष्य केले. घराला कुलूप असल्याचे पाहून ३ दरोडेखोर पहिल्या मजल्यावर गेले. मात्र, दरवाजा उघडला नाही म्हणून दरोडेखोरांनी बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर दरोडेखोर शेजारच्या रिकाम्या प्लॉटवरून मुख्य रस्त्याकडे जाण्यासाठी निघाले. तारेचे कुंपण तोडून ते रस्त्यावर आले. तेथून दरोडेखोरांनी रामदूत हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या सहानी यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केला. बंगल्याचे गेट न उघडता आल्याने त्यांनी शेजारच्या संदीप हाडोळतीकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला. परंतु तिथेही त्यांच्या हाती काही लागले नाही. सर्व दरोडेखोर सहानी यांच्या घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
चॅनल गेट तोडून बंगल्यात प्रवेश
सुरुवातीच्या प्रयत्नात काहीच हाती लागले नाही. दरोडेखोरांनी नीलेश प्रवीण बागूल यांच्या बंगल्याचे चॅनल गेट तोडून प्रवेश केला. या घरात नीलेश यांच्यासह आई-वडील, भाऊ, दोघांच्या पत्नींसह मुले राहतात. हॉलमध्ये झोपलेले नीलेश यांचे वडील प्रवीण यांच्या गळ्याला कोयता लावून दरोडेखोरांनी नीलेश यांना बेडरूम उघडण्यास सांगितले. वडिलांच्या आवाजाने नीलेश यांनी बेडरूमचा दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी त्यांच्याही गळ्याला कोयता लावला. बेडरूममध्ये शिरून त्यांनी नीलेशच्या पत्नीला चाकू दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यास सांगितले. त्याचवेळी वीज गेल्याचा फायदा दरोडेखाेरांना झाला. अर्धा तासापेक्षा अधिक वेळ दरोडेखोर बंगल्यात होते.
दागिने, रोख रकमेसह चिल्लरही नेली
दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असतानाच नीलेश यांचा दोन वर्षांचा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला. समोरचे दृश्य पाहून मुलगा रडू लागल्यामुळे दरोडेखोरांनी नीलेशच्या पत्नीला मुलाला आमच्या ताब्यात दे, असे म्हणत मुलाला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, नीलेश यांच्या पत्नीने मुलाला देणार नाही, तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा? असे सांगितले. त्यानंतर दरोडेखोरांनी बेडरूमच्या कपाटासह महिलेच्या अंगावरील १ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, किराणा दुकानातील रोख रकमेसह चिल्लरही नेली.
मोबाइल हिसकावले, बेडरूममध्ये कोंडले
दरोडेखोरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी नीलेश, त्यांची पत्नी आणि वडिलांचे मोबाइल हिसकावून घेतले. हे मोबाइल बाहेर टाकणार असल्याचे दरोडेखोरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर तिघांना एका बेडरूममध्ये कोंडले. बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर दरोडेखोरांनी बाहेरच्या चॅनल गेटलाही कुलूप लावले व पळून गेले. नंतर भयभीत नीलेश यांनी वरच्या मजल्यावर झोपलेला भाऊ चेतन यांना आवाज दिला. चेतन हे खाली आल्यानंतर त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला.वडील, भाऊ, वहिनी यांनी घाबरलेल्या अवस्थेतच दरोडा पडल्याचे सांगितले. त्यानंतर चेतन यांनी शेजाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती दिली.
सातारा पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती समजताच सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घराची तपासणी केल्यानंतर तिघांच्या मोबाइलचे टॉवरवरून लोकेशन मिळवले. नीलेश यांचा मोबाइल बंगल्यासमोरील राममंदिर परिसरातील मोकळ्या जागेत पोलिसांना सापडला. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, पावसामुळे श्वानाला माग काढता आला नाही. घरातील कपाटावरील दरोडेखोरांचे ठसे घेण्यात आले. पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिस घटनास्थळी तळ ठोकून होते. दरोडेखोर धुळे-सोलापूर महामार्गाने गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
जबरी चोरीच्या कलमाअन्वये गुन्ह्याची नोंद
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दरोड्याचे कलम न लावता जबरी चोरीचे कलम लावत गुन्हा नोंदवला. तसेच एफआयआरमध्ये संपूर्ण घटनाक्रमही सविस्तर घेतलेला नाही. तिघांना कोंडल्याची, मोबाइल ताब्यात घेतल्याची नोंदही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी नीलेश बागूल यांच्या तक्रारीवरुन जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.