मोकळ्या मैदानातील, महाविद्यालय, शाळांबाहेरील टवाळखोरांना बसणार पोलिसांच्या लाठीचे फटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:30 IST2025-07-29T14:25:27+5:302025-07-29T14:30:02+5:30
पाच अधिकारी, ३० अंमलदारांचे विशेष पथक गस्त घालणार : पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांचे आदेश;

मोकळ्या मैदानातील, महाविद्यालय, शाळांबाहेरील टवाळखोरांना बसणार पोलिसांच्या लाठीचे फटके
छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालय, शाळांबाहेर थांबून धिंगाणा, धाक-दडपशाहीसोबत मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर आता पोलिसांच्या लाठीचे फटके बसणार आहेत. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सोमवारपासून पाच अधिकारी व ३० अंमलदारांच्या विशेष पथकाला याबाबत आदेशित केले आहे. शाळा, महाविद्यालयांसोबत मोकळी मैदाने, कट्ट्यांवर बसून दारू, सिगारेट पिणाऱ्यांवरही कठोर कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये शहर, महाविद्यालयाबाहेर भांडण, हाणामाऱ्याच्या घटनांनी परिसर असुरक्षित झाले आहेत. मुलींचा पाठलाग, शाळेबाहेर थांबून अश्लील शेरेबाजीचे प्रकार घडत आहेत. रामनगर, संजयनगर, विठ्ठलनगरमधील नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती. स. भु. महाविद्यालयाबाहेरही नुकताच मोठा राडा झाला. याप्रकरणी प्राचार्यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत कारवाईची मागणी केली होती. त्यावर पवार यांनी कुठल्याच महाविद्यालय, शाळांना टवाळखोरांचा त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले.
पोलिस दिसताच धावपळ, सोमवारी शांतता
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर यांच्या विशेष पथकाला याबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर नेहमी टवाळखोरांचा आरडाओरडा, मोठमोठ्याने शिवीगाळ ऐकू येणाऱ्या स. भु. महाविद्यालय परिसरात शुक्रवार व शनिवारी पथकाने टवाळखोरांची यथेच्छ धुलाई केली. सोमवारी दुपारी १ वाजता पथक पोहोचताच एकच धावपळ उडाली. रस्त्यावरच आरडाओरड, गाणे गाणाऱ्यांना लाठीचा प्रसाद मिळताच काही मिनिटांत परिसर शांत झाला.
मैदाने तपासा, उघड्यावर दारू, नशेखोरी नकोच
गेल्या आठवड्याभरात बीड बायपास, शहानूरमियाँ दर्गा चौक, टीव्ही सेंटर चौकातील मैदानांची रात्री तपासणी सुरू करण्यात आली. मैदानावर बसून दारू व अन्य नशा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. नुकतीच शहानूरमियाँ दर्गा परिसरात सिग्मा रुग्णालयामागील मैदानावर टवाळखोर, नशेखोरांची पोलिसांनी धुलाई केली.