ट्रकवर रिक्षा धडकली, चालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:16 IST2019-09-10T17:15:59+5:302019-09-10T17:16:08+5:30
रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव रिक्षा धडकल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

ट्रकवर रिक्षा धडकली, चालक गंभीर
वाळूज महानगर : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव रिक्षा धडकल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी वाळूज एमआयडीसीत घडली. शेख अब्दुल कादर असे जखमीचे नाव आहे.
शेख अब्दुल कादर (रा. दौलताबाद) हा अॅपेरिक्षा चालवितो. सोमवारी सायंकाळी शेख हा वाळूज एमआयडीसीतून अॅपेरिक्षा (एमएच-२०, ईएफ-२०१२) घेवून सिएट रोडने साजापूरच्या दिशेने येत असताना घाणेगाव फाट्यावर एका व्यक्तीला रिक्षाचा धक्का लागला.
तो न थांबताच पुढे जात असताना काही जणांनी त्याचा पाठलाग सुरु केला. आपला पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच त्याने रिक्षा भरधाव साजापूरच्या दिशेने नेला. मात्र कार्ल्सबर्ग कंपनी जवळ आला असता त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.