सेवानिवृत्त फौजदाराने ‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केले अन बँक खाते झाले रिकामे, १० लाख ऑनलाईन लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 13:42 IST2022-01-15T13:41:09+5:302022-01-15T13:42:15+5:30
cyber crime एसबीआय बँकेचे ऑनलाइन ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावर केला संपर्क

सेवानिवृत्त फौजदाराने ‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केले अन बँक खाते झाले रिकामे, १० लाख ऑनलाईन लांबवले
पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील चणकवाडी येथील सेवानिवृत्त फौजदाराच्या खात्यातून तब्बल १०.२४ लाख रुपयांची रक्कम सायबर भामट्याने लांबवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. ‘ऐनी डेस्क’ नावाचे ॲप डाऊनलोड करताच भामट्याने फौजदाराचे खातेच रिकामे केले.
सायबर गुन्हेगार (cyber crime) विविध फंडे वापरून ऑनलाइन गंडा घालत आहेत.
चणकवाडी येथील सेवानिवृत्त फौजदार तुकाराम मोहिते(६३) यांचे एसबीआय बँकेत खाते असून, गुरुवारी(दि.१३) सकाळी ८.४५ वाजता एसबीआय बँकेचे ऑनलाइन ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी मोहिते हे मोबाइलमध्ये सर्चिंग करत होते. त्यांना गुगलवर एसबीआय बँकेच्या हेल्पलाइन नंबर मिळाला. त्या क्रमांकावर त्यांनी फोन केला. समोरून मी एसबीआय बँकेचा अधिकारी बोलत आहे, असे सांगितले गेले.
बँकेचे ॲप डाऊनलोड करायचे असेल तर त्यापूर्वी ‘ऐनी डेस्क’ नावाचे ॲप डाऊनलोड करा, असे मोहिते यांना सांगण्यात आले. त्यामुळे मोहिते यांनी ऐनी डेस्क ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर सदर व्यक्तीने ॲप आयडी कोड विचारला. बँकेचा अधिकारीच बोलत असल्याने मोहिते यांनी कोडही सांगितला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातील तब्बल १० लाख २४ हजारांची रक्कम सायबर भामट्याने काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुकाराम मोहिते यांनी पैठण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात सायबर गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे करीत आहेत.
दोन लाख ४५ हजार वाचले
सायबर भामटे तुकाराम मोहिते यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेत होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा दाखल करण्याअगोदर पोलीस निरीक्षक किशोर पवार व उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी याबाबत बँकेला अवगत करून खाते सील केले. त्यामुळे मोहिते यांच्या खात्यातील दोन लाख ४५ हजार रुपयांची रक्कम वाचली.