बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष झंझावात होता
By Admin | Updated: August 25, 2014 00:24 IST2014-08-25T00:13:04+5:302014-08-25T00:24:00+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष एक झंझावात, तुफान होते. त्याने प्रारंभीच्या काळात समता स्थापण्याचा प्रयत्न केला.

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष झंझावात होता
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष एक झंझावात, तुफान होते. त्याने प्रारंभीच्या काळात समता स्थापण्याचा प्रयत्न केला. वंचितांना न्याय दिला; परंतु आता त्याचे झालेली शकलं पाहवत नाहीत, असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले, रिपाइंचे पूर्वाश्रमीचे नेते, साहित्यिक एल.आर. बाली यांनी रविवारी येथे काढले.
सम्यक बौद्ध उपासक- उपासिका महासंघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. अरविंद गायकवाड अध्यक्षस्थानी होते. शिवदास कांबळे, प्रा. डॉ. यशवंत खिल्लारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
एल.आर. बाली म्हणाले, देशात एकाच वेळी सव्वादोन लाख कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेत कारागृहात जाणे ही जबरदस्त ताकद रिपाइंची होती. भूमिहीनांच्या आंदोलनाने लाखो एकर जमीन दलितांना मिळवून दिली; परंतु यशवंतराव चव्हाण यांच्या बोलण्यात येऊन दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेसशी युती केली. दिल्लीत तेव्हा पक्षाची बैठक झाली. ही युती म्हणजे रिपब्लिकनची कबर आहे, असे मत मी नोंदविले होते.
सध्याच्या स्थितीत रिपब्लिकन पक्ष मजबूतपणे उभा राहू शकतो; परंतु सध्या विकाऊ कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. तुम्ही स्वत:ला बाजारात उभे करणे बंद करा, पक्ष आजही मजबुतीने उभा राहील. यासाठी आजही आपण काम करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे मूळ लेखन व काही अनुभवही यावेळी बाली यांनी सांगितले. त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भारत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भीमराव मुगदल यांनी आभार मानले.