सुसाट कारच्या धडकेत प्रख्यात प्राध्यापक डॉ. राम माने यांचा पत्नीसह हृदयद्रावक मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 23:38 IST2025-10-25T23:37:30+5:302025-10-25T23:38:12+5:30
विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, न्यायनिष्ठ वकील दांपत्याच्या मृत्यूने शैक्षणिक, न्याय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

सुसाट कारच्या धडकेत प्रख्यात प्राध्यापक डॉ. राम माने यांचा पत्नीसह हृदयद्रावक मृत्यू!
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे ज्येष्ठ संशोधक, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव आत्माराम माने (वय ७३) आणि त्यांची पत्नी, हायकोर्टातील निष्ठावान व वरिष्ठ वकील ॲड. रत्नमाला साळुंके-माने (वय ६५) यांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी पडेगाव येथील आर्च आंगणसमोर घडली आहे.
माने दांपत्य रस्ता ओलांडत असताना, भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या आदर्श दांपत्याचा जागीच अंत झाला. या अकस्मात आणि चटका लावणाऱ्या निधनाने शैक्षणिक, न्याय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. राम माने: संशोधक ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक
डॉ. रामराव माने यांनी १९८० ते २०२४ या प्रदीर्घ काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या अध्यापनशैलीतील विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि विषयावरील सखोल ज्ञान यामुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात.
* संशोधनाचे योगदान: अनेक पेटंट त्यांच्या नावावर असून, ते देशभरातील नामांकित संशोधकांपैकी एक होते.
* शैक्षणिक धोरण: राज्याच्या शैक्षणिक धोरण समिती सदस्य असताना त्यांनी अमूल्य योगदान दिले होते.
* प्रशासन: २००६ ते २०१० दरम्यान ते विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते.
* धाराशिव उपपरिसर: विद्यापीठाच्या धाराशिव (उस्मानाबाद) उपपरिसर उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
ॲड. रत्नमाला माने: समाजनिष्ठ, आदर्श वकील
ॲड. रत्नमाला साळुंके-माने यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ हायकोर्टात यशस्वी वकिली केली. प्रामाणिकपणा, तळमळ आणि सामाजिक जाणीव यामुळे त्या वकिलांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.
असंख्य विद्यार्थ्यांवर शोककळा
माने दांपत्यास अपत्य नव्हते, परंतु त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याप्रमाणे जपले, मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांचे घर नेहमीच विद्यार्थ्यांसाठी खुले असायचे. त्यामुळे, त्यांच्या या अपघाती निधनाने केवळ कुटुंबातच नव्हे, तर त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक आणि शेकडो विद्यार्थ्यांवर यामुळे शोककळा पसरली आहे.
मूळगावी होणार अंत्यसंस्कार:
माने दांपत्याचा पार्थिव रविवारी (दि. २६) धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी रुईभर येथे नेण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.