ई-लायब्ररीसाठी रिमोट अॅक्सेस
By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T00:48:09+5:302014-05-23T01:09:10+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लायब्ररी अद्ययावत करण्यात आली आहे.

ई-लायब्ररीसाठी रिमोट अॅक्सेस
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लायब्ररी अद्ययावत करण्यात आली आहे. तेथील ई-लायब्ररीत सुमारे १९ लाख ई-जर्नल्स आणि ३० लाख ई-बुक्स आहेत. या ग्रंथसंपदेचा लाभ प्राध्यापकांना वेळ आणि स्थळाचे बंधन न ठेवता घेता यावा, यासाठी त्यांना आता रिमोट अॅक्सेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिक्षकांना आता त्यांचा युजर नेम आणि पासवर्ड दिला जात आहे. त्याआधारे ते आता कोठेही इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या ई-लायब्ररीमधील ग्रंथ वाचू शकतील. त्यांना हवी तेवढी पुस्तके, जर्नल्स, संशोधन पेपर ते डाऊनलोड करू शकणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन बसण्याची गरज नाही. विद्यापीठातील ग्रंथालय विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यापीठातील विविध विभागांत शिक्षण घेणारे विद्यार्थी, संशोधक आणि अध्यापक, असे ३ हजार ५०० सदस्य असलेले लोक तेथील ग्रंथसंपदेचा लाभ घेत असतात. ग्रंथासोबतच तेथे आता ई-लायब्ररीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-लायब्ररीमध्ये १९ हजार ई-जर्नल्स आणि ३० लाखांहून अधिक ई-बुक आहेत. विद्यार्थ्यांनाही लायब्ररीमधील डिजिटल विभागात बसून ई-जर्नल आणि ई-बुक वाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी खुली असते. विद्यापीठात कार्यरत असलेल्या शिक्षकांना रिमोट अॅक्सेसची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. रिमोट अॅक्सेसची सुविधा देणारे आपले विद्यापीठ देशातील पहिले ठरले आहे, अशी माहिती ग्रंथपाल धर्मराज वीर यांनी दिली. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठाने बंगळुरू येथील एका कंपनीकडून सॉफ्टवेअर खरेदी केले आहे. त्यासाठी दोन लाख रुपये प्रतिवर्ष शुल्क भरावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ई-लायब्ररी सुरू केल्यापासून या लायब्ररीचा वापरही झपाट्याने वाढला आहे. २००८ मध्ये विद्यापीठाच्या ई-लायब्ररीमधून १२ हजार रिसर्च पेपर डाऊनलोड करण्यात आले होते. आता त्यात झपाट्याने वाढ झाली असून, गतवर्षी तब्बल १ लाख ६५ हजार रिसर्च पेपर संशोधनकर्त्यांनी डाऊनलोड करून घेतले आहेत. यावरून विद्यापीठात होणार्या संशोधनाची दखल जगभर घेतली जात आहे. कालपर्यंत विद्यापीठातील संगणकाच्या माध्यमातून शिक्षकांना ई-लायब्ररीतील ग्रंथ आणि जर्नल्सचा वापर करता येत होता. आता ही सुविधा अधिक व्यापक करण्यात आली आहे.लायब्ररीचे सदस्य असलेल्यांना पुस्तके वाचण्यासाठी घरी नेण्याची सुविधा आहे. मात्र, आजपर्यंत ई-लायब्ररीची सुविधा केवळ लायब्ररीमध्येच उपलब्ध होती. अध्यापनाचे कार्य करणार्या शिक्षकांना प्रत्येक वेळी लायब्ररीमध्ये जाऊन बसणे आणि संदर्भ गं्रथ हाताळणे शक्य होत नाही. त्यांची अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाने ई-लायब्ररीची सुविधा उपलब्ध केली.