आमचा हात धरून मोठे झालात, हे लक्षात ठेवा! शिरसाटांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:10 IST2025-06-05T16:02:29+5:302025-06-05T16:10:01+5:30
इतका अहंकार बरा नाही. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जिंकणे शक्य नाही: संजय शिरसाट

आमचा हात धरून मोठे झालात, हे लक्षात ठेवा! शिरसाटांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सुनावले
छत्रपती संभाजीनगर : स्थानिक भाजप नेते अत्यंत जोशात आहेत. आम्ही काय बोलावे, काय बोलू नये, हे आम्ही पाहू. आम्ही त्यांच्यामुळेच उठाव केला आणि सत्तेत आलो, आणि ते कुणामुळे सत्तेत आले, याचाही विचार त्यांनी करावा, असा टोला पालकमंत्री तथा शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी बुधवारी लगावला.
इतका अहंकार बरा नाही. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जिंकणे शक्य नाही. स्थानिक पातळीवर युती हवी, असे शिवसेनेचे धोरण आहे. पण, ज्यांना युती होऊ नये, असे वाटते त्यांनी पक्षाच्या प्रमुखांना तसे कळवावे. मात्र, जाहीर वक्तव्ये करू नये, त्याचा परिणाम मतदारांवर होतो, असेही शिरसाट यांनी भाजप नेत्यांना सुनावले. आधी भाजप नेत्यांनी शिंदेसेनेला डिवचले, मग शिंदेसेने भाजप घमेंड करत असल्याचा टोला लगावला. पुन्हा भाजपने १९८८ च्या प्रमाणे तुमची स्थिती नसल्याची टीका केल्यानंतर बुधवारी शिरसाट यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले.
मोठा भाऊ कोण, हे वेळच ठरवेल...
निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हे करतात. विधानसभेत असे अनेक सर्व्हे झाले, मात्र त्यातील ८० टक्के सर्व्हे चूक निघाले. त्या आधारे राजकीय गणित बांधणे चुकीचे आहे. मात्र, पक्षाच्या परिस्थितीचा आढावा सर्व्हेतून घेतला जातो. येणाऱ्या मनपा निवडणुकीत कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ असेल, हे अजून ठरलेले नाही. आता सांगितले तर वाद होतील. सध्याचा प्राथमिक सर्व्हे असून आगामी काळात कोण, कुठे, कसे लढणार, हे स्पष्ट झाल्यावर होणाऱ्या सर्व्हेला महत्त्व असेल. सध्या फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे. त्यानुसार काही घडेल, असे मानणे योग्य नाही. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे, मोठा भाऊ कोण हे निवडणुकीवेळी ठरेल. दरम्यान, वेदांतचा विषय माझ्यासाठी संपला आहे. काही जण खोदकाम करीत आहेत. त्यांनी आता काय करायचे ते करावे. असेही शिरसाट म्हणाले.