विद्यार्थ्यांना दिलासा! आता चौथीसाठी पाच हजार, तर सातवीसाठी साडेसात हजारांची शिष्यवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:35 IST2025-11-01T19:34:16+5:302025-11-01T19:35:26+5:30
शालेय शिक्षण विभागाकडून नियमात सुधारणा, चालू वर्षी चार वर्गांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा

विद्यार्थ्यांना दिलासा! आता चौथीसाठी पाच हजार, तर सातवीसाठी साडेसात हजारांची शिष्यवृत्ती
छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात यावर्षीपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पहिले पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे करण्यात येत होते. मात्र, शालेय शिक्षण विभागाने परीक्षेसाठीच्या वर्गात बदल केला आहे. यावर्षीपासून चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. त्याविषयीचे अर्ज भरण्यासह सुरुवात झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
शालेय शिक्षण विभागाने यावर्षीपासून चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी होती. मात्र, त्यात बदल करण्यात आला आहे.
यंदा कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसता येणार?
यावर्षीच शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात बदल केला. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे नोटीफिकेशन निघालेले असल्याने यावर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. पुढील वर्षी मात्र, केवळ चौथी आणि सातवीतील विद्यार्थी सहभागी असणार आहेत.
कशामुळे केला बदल?
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या परीक्षेला बसतात. मात्र, अनेक गावांतील शाळा या चौथीपर्यंतच आहेत. त्याशिवाय काही गावातील शाळा फक्त सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागते. त्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
कधीपासून होणार लागू?
यावर्षीपासूनच हा बदल लागू करण्यात येणार आहे. त्याविषयीचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
कोणत्या वर्गासाठी किती शिष्यवृत्ती?
चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रती महिना ५०० रुपये याप्रमाणे वार्षिक पाच हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याशिवाय सातवीतील विद्यार्थ्यांसाठी प्रती महिना ७५० रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये दिले जाणार आहेत. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर तीन वर्ष विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाणार आहे.
कधी घेतली जाणार परीक्षा
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. तसेच चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्याचे नियाेजन केले आहे. याविषयीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीतील सर्वाधिक विद्यार्थी बसतील. याकडे प्राथमिक विभाग लक्ष देत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने भरारी घेतलेली आहे. त्यात यावर्षी आणखी प्रगती करण्याचा प्रयत्न असणार आहे.
- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग