दिलासा! उद्योजकांसाठी बीपीसीएलचा 'फास्ट ट्रॅक' प्लॅन, आठवड्यात पाइपलाइनद्वारे गॅस कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:15 IST2026-03-17T13:10:19+5:302026-03-17T13:15:01+5:30
उद्योजकांसाठी बीपीसीएलचा 'फास्ट ट्रॅक' प्लॅन, आठवड्यात मिळणार कनेक्शन

दिलासा! उद्योजकांसाठी बीपीसीएलचा 'फास्ट ट्रॅक' प्लॅन, आठवड्यात पाइपलाइनद्वारे गॅस कनेक्शन
छत्रपती संभाजीनगर : गॅसची मागणी नोंदवा आणि करार करा, आम्ही तातडीने पाइपलाइनद्वारे तुमच्या उद्योगापर्यंत गॅसचा पुरवठा करू, असे आश्वासन भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांना सोमवारी येथे दिले.
एलएनजी-एलपीजीच्या उपलब्धतेअभावी उद्योगांना भेडसावत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे उद्योग प्रतिनिधी आणि बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांसोबत सीएमआयए सभागृह येथे सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला सीएमआयएचे सचिव मिहिर सौन्दगलेकर यांनी उद्योग क्षेत्राची गॅसटंचाईबाबतची सद्य:परिस्थिती मांडत विविध प्रश्न मांडले. यावर बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत एलएनजी पुरवठा अधिक वेगाने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. उपाध्यक्ष अथर्वेशराज नंदावत यांनी गॅस जोडणी प्रक्रिया गतिमान करून लागणारा कालावधी एक आठवड्यावर आणण्याची विनंती केली.
बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एलएनजीचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. ज्या उद्योगांनी गॅस सप्लाय ॲग्रीमेंट (जीएसए) आणि आवश्यक देयक प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा कंपन्यांना प्राधान्याने एलएनजी पुरवठा सुरू करण्यात येईल. आजपर्यंत सुमारे १० उद्योगांनी जीएसए करार केला आहे. मीटर उपलब्धतेची समस्या सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली. ज्या उद्योगांना एलएनजीची आवश्यकता आहे, त्यांनी बीपीसीएलकडे नोंदणी करून मागणी कळवावी, जीएसए करार पूर्ण करावा. उद्योग परिसरातील अंतर्गत गॅस पाइपलाइनची कामे पूर्ण करावीत, जेणेकरून गॅस पुरवठा सुरू करताना विलंब होणार नाही. सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.
बैठकीला सौरभ छल्लाणी यांच्यासह बीपीसीएलचे सीजीएम राजीव कुमार, मिलिंद लभाणे, क्षेत्रीय व्यवस्थापक मनोज कुमार जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक अनुपम श्रीवास्तव, विक्री अधिकारी पुनीत गुप्ता आणि सचिन साळुंखे आदी उपस्थित होते. तसेच, सुमारे ५० उद्योग प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला.