दोन पिढ्या, एक भूमी! पारोच्या प्रेमकथेचा नायक रॉबर्ट गिल यांचे पणतू अजिंठा लेणीच्या प्रेमात
By संतोष हिरेमठ | Updated: December 3, 2025 18:23 IST2025-12-03T18:15:03+5:302025-12-03T18:23:27+5:30
अजिंठा लेणीचे पेटिंग जगभर पोहोचविणारे रॉबर्ट गिल यांचे पणतू मधुचंद्रासाठी छत्रपती संभाजीनगरात

दोन पिढ्या, एक भूमी! पारोच्या प्रेमकथेचा नायक रॉबर्ट गिल यांचे पणतू अजिंठा लेणीच्या प्रेमात
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे पेटिंग जगभरात पोहोचविणारे रॉबर्ट गिल यांचे पणतू डाॅ. केनेथ डुकाटेल यांनी मधुचंद्रासाठी अजिंठ लेणी आणि छत्रपती संभाजीनगरची निवड केली. छत्रपती संभाजीनगरात दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी पत्नी कॅथरीना सुयकेन्स यांच्यासह अजिंठा लेणीला भेट दिली. लेणीतील पेटिंग पाहून तेही थक्क झाले. ‘आज इथे येणे सोपे आहे, पण त्याकाळी आमचे पणजोबा येथे कसे आले असतील, कसे येथे राहिले असतील’, असे प्रश्न डुकाटेल यांना पडले. त्यांनी ते कुतूहल व्यक्तही केले.
अजिंठा लेणीचे संरक्षण सहायक मनोज पवार यांनी त्यांचे स्वागत केले. गाइड भरत जोशी यांनी लेणीविषयी माहिती दिली. येथील भिंतीचित्र, मूर्ती काम, नक्षीकाम खूप सुंदर असून, भारत सरकार चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहे, असे डाॅ. डुकाटेल म्हणाले.
कोण होते राॅबर्ट गिल?
रॉबर्ट गिल हे एक ब्रिटिश चित्रकार व अधिकारी होते. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात ते भारतात आले, तेव्हा त्यांना अजिंठा लेणींच्या भित्तीचित्रांना पाहण्याची संधी मिळाली. अजिंठा लेणी महाराष्ट्रात वसलेली एक प्राचीन लेणी समूह आहे, जे आपल्या भित्तीचित्रांनी जगभर प्रसिद्ध आहेत. गिल यांनी अजिंठा लेणींमधील भित्तीचित्रे कागदावर आणि कॅनव्हासवर उतरविली. यासाठी त्यांनी खूप काळ मेहनत घेतली. त्यांच्यामुळे अजिंठा लेण्यांतील पेटिंगचा जागतिक स्तरावर प्रसार झाला. १८४५ मध्ये अजिंठ्यात आल्यावर अजिंठ्याच्या लेण्यांत उत्खननाचे काम जोरात सुरू होते. हजारो मजूर यात गुंतले होते. यातच एक म्हणजे लेणापूर गावची आदिवासी कन्या पारो. या परिसरातील खडान् खडा माहिती असलेली पारो गिल यांना मदत करायची. हळूहळू मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रॉबर्ट गिल-पारो प्रेमकहाणीही प्रसिद्ध आहे.
काय म्हणाले राॅबर्ट गिल यांचे पणतू?
‘जगाच्या या अद्भुत गोष्टीचे जतन करण्याची तुमची मोठी जबाबदारी आहे, पण ही जबाबदारी तुम्ही कौशल्याने पार पाडत आहात. माझे महान पणजोबा मेजर डॉ. गिल यांच्याप्रति तुमच्या आदराने मी खूप आनंदी झालो आहे. माझ्या सहलीच्या निमित्ताने मला या अद्भुत स्थळाला भेट देता आली. हा एक असा खजिना आहे, जो आपण आयुष्यभर जपून ठेवला पाहिजे.