मुलीच्या अपहरणासाठी १५ दिवसांपासून रेकी, जुनी कार, बंदूक खरेदी; मास्टरमाइंड अद्याप फरारच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:21 IST2025-07-19T13:21:29+5:302025-07-19T13:21:48+5:30
पुण्यात त्यांचा एक अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर गावातीलच एका सधन कुटुंबातील शहरात राहणाऱ्या नातीचे अपहरण करून दीड कोटींची खंडणी मागण्याचे त्याने ठरवले.

मुलीच्या अपहरणासाठी १५ दिवसांपासून रेकी, जुनी कार, बंदूक खरेदी; मास्टरमाइंड अद्याप फरारच
छत्रपती संभाजीनगर : खासगी शिकवणी संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीचा चार आरोपींनी कारमधून अपहरणाचा प्रयत्न बुधवारी केला हाेता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली. यात अद्यापही मास्टरमाइंडसह दोन आरोपी पसार असून त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता खोकडपुऱ्यात आजी- आजोबांसोबत राहणाऱ्या ११ वर्षीय नेहाचे शिकवणीवरून परतल्यानंतर अपहरणाचा प्रयत्न झाला. अपहरणकर्त्यांनी नेहाची रोज ने- आण करणारे कारचालक नवनाथ चेडे यांना बोलण्यात गुंतवूण ठेवत नेहाला कारमध्ये काेंबून सुसाट वेगात पसार झाले. मात्र, चेडे व स्थानिक सतर्क नागरिकांनी कारवर दगड फेकून पाठलाग सुरू केला. शिवाजीनगरमध्ये वाहतूक खोळंबली असल्याने अपहरणकर्त्यांचा कारचा वेग कमी झाला. त्यांनी नेहाला कारबाहेर काढून देत पोबारा केला.
पोलिसांनी कारच्या मुळ मालकाचा शोध घेत आरोपींचा शोध सुरू केला. चोवीस तासांमध्ये पोलिसांनी संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (३२, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) आणि बाबासाहेब अशोक मोरे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) यांना अटक केली, तर घटनेचा मास्टरमाइंड गणेश ज्ञानेश्वर मोरे आणि बळीराम ऊर्फ भय्या मोहन महाजन (दोघेही रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) हे अद्यापही फरार आहेत.
अपहरणासाठी कार, बंदुकीची खरेदी
गुन्ह्याचा मास्टरमाइंड गणेश गेल्या पंधरा दिवसांपासून अपहरणाचे नियोजन आखत होता. पुण्यात त्यांचा एक अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर गावातीलच एका सधन कुटुंबातील शहरात राहणाऱ्या नातीचे अपहरण करून दीड कोटींची खंडणी मागण्याचे त्याने ठरवले. या अपहरणासाठीच त्याने दीड महिन्यांपूर्वी जुन्या कारसह एका छऱ्याच्या बंदुकीची खरेदी केली होती.
मास्क असल्याने ओळखले नाही
दरम्यान, चालक चेडे, अपहरणकर्ते, नेहाचे कुटुंब एकाच गावातील आहे, तरीही अपहरणादरम्यान चेडेने एकालाही कसे ओळखले नाही, असा प्रश्न पेालिसांना पडला होता. चौकशीदरम्यान, अपहरणकर्त्यांपैकी एक जणच माझ्यासमोर आला. त्या सर्वांनी तोंडाला काळे मास्क लावलेले असल्याने ते ओळखीचे लोक आहे, हे समजून आले नाही, अशी बाजू चेडे यांनी पोलिसांच्या जबाबात मांडली.