जालन्यात होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:28 PM2019-07-30T18:28:31+5:302019-07-30T18:31:52+5:30

मराठवाड्याची अनेक दशकांची मागणी मार्गी

Regional psychological hospital of 365 beds soon establish in Jalana | जालन्यात होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

जालन्यात होणार ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

googlenewsNext
ठळक मुद्दे१० एकर जागा देण्याची प्रक्रिया सुरु रत्नागिरीच्या धर्तीवर उभारणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील कित्येक दशकांची प्रादेशिक मनोरुग्णालयाची मागणी अखेर मार्गी लागली आहे. जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून १० एकर जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली. 

राज्यात सध्या प्रादेशिक स्तरावर चार मनोरुग्णालये आहेत. संपूर्ण मराठवाड्यासाठी एकही मनोरुग्णालय नाही. विशेष म्हणजे ब्रिटिशांच्या काळात जालना येथे कार्यरत असलेले प्रादेशिक मनोरुग्णलय हे ६० च्या दशकात राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे बंद झाले. तेव्हापासून म्हणजेच पाच दशकांपासून संपूर्ण मराठवाड्यात एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही. त्यामुळेच मराठवाड्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाची गेल्या दोन ते तीन दशकांपासून कायम मागणी केली जात होती.

औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रत्येक शहरांमध्ये रस्त्यारस्त्यांवर, कुठेतरी कोपऱ्यात, अस्वच्छतेत, ऊन-पावसात, थंडीमध्ये कितीतरी मनोरुग्ण दुर्लक्षित अवस्थेत पडून असतात. कमी-अधिक प्रमाणात मानसिक रुग्णांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यांच्यावर आंतररुग्ण उपचार व पुनर्वसन समुपदेशनासाठी गैरसोयीला तोंड द्यावे लागते. मनोरुग्णांना उपचारासाठी थेट पुणे गाठावे लागते. आजघडीला मराठवाड्यातील मनोरुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई, नागपूर, रत्नागिरी ही शहरे गाठवी लागतात. अन्यथा खाजगी रुग्णालयांतील महागडे उपचार घ्यावे लागतात. यामुळे अनेकदा उपचारांकडेच दुर्लक्ष केले जाते. त्यातून रुग्णांची हेळसांड होते. परंतु जालना येथील प्रस्तावित रुग्णालयामुळे मनोरुग्णांना होणाऱ्या वेदना कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
रत्नागिरीच्या धर्तीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय अधीक्षकांपासून तर सफाईगारापर्यंत अशी २६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. हे रुग्णालय औरंगाबादला उभारण्याची मागणी होत होती. 

आराखडा तयार होईल
आरोग्य सुविधांसंदर्भात समतोल विकास साधला जात आहे. त्यादृष्टीने जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णलय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयासाठी १० एकर जागा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनोरुग्णालयाचा आराखडा बनविला जाईल.
-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण
प्रादेशिक मनोरुग्णालय मराठवाड्यात व्हावे, ही पहिली मागणी होती. त्यानंतर ते औरंगाबादेत उभारण्यात यावे, अशी इच्छा होती. परंतु ते जालन्यात होत आहे, हेदेखील मोठी बाब आहे. जालना आणि औरंगाबाद जुळी शहरेच आहेत. अखेर या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला. मराठवाड्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे.    
-डॉ. अशोक बेलखोडे, सदस्य, मराठवाडा विकास मंडळ तथा अध्यक्ष, आरोग्य समिती

Web Title: Regional psychological hospital of 365 beds soon establish in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.