साखरपुड्यानंतर वधूवर अत्याचार करून लग्नास नकार; नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 18:38 IST2021-04-21T18:37:03+5:302021-04-21T18:38:34+5:30
साखरपुड्यानंतर आरोपीने तिला फिरून येऊ असे म्हणून सोबत नेले.

साखरपुड्यानंतर वधूवर अत्याचार करून लग्नास नकार; नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा
औरंगाबाद : साखरपुडा केल्यावर लग्नापूर्वीच नियोजित वधूसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर लग्न मोडून पीडितेला मारहाण करणाऱ्या छायाचित्रकार नवरदेवासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवरदेव आकाश मुरलीधर साळवे (२४), त्याचे वडील मुरलीधर साळवे, भाऊ अमोल आणि रवी साळवे आणि एका महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार २०१८ मध्ये बीड बायपासवरील एका लॉन्सवर नातेवाइकाच्या लग्नाला आई-वडिलांसह पीडिता गेली होती. त्या लग्नसोहळ्याचे फोटो आरोपी आकाश काढत होता. लग्नानंतर काही दिवसांनी आरोपीने पीडितेच्या नातेवाइकांकडून तिचा मोबाइल क्रमांक मिळवून लग्नात काढलेली तिचे छायाचित्र मोबाइलवर पाठवले होते. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. पीडिता आणि तिच्या आई- वडिलांनी त्यास होकार कळविला. दरम्यान, डिसेंबर २०२० मध्ये पीडिता आणि आकाशचा साखरपुडा झाला. काही दिवसांनी आरोपीने तिला फिरून येऊ असे म्हणून सोबत नेले. तो तिला मुकुंदवाडी परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला.
काही दिवसांनी मात्र त्याने अचानक तिला भेटणे आणि तिच्यासोबत संभाषण बंद केले. याविषयी पीडितेने त्याला विचारले असता त्याने तिला लग्नास नकार देत असमर्थता दर्शविली. यामुळे संतप्त झालेली पीडिता आणि तिचे आई- वडील, भाऊ हे याविषयी जाब विचारण्यासाठी आकाशच्या घरी गेले असता आरोपी आकाश आणि त्याच्या आई- वडील आणि भाऊ यांनी पीडितेसह तिच्या नातेवाइकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. आकाशचे तुझ्यासोबत लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी आरोपींनी पीडितेला दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारामुळे पीडितेने मंगळवारी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड तपास करीत आहेत.