छत्रपती संभाजीनगर : गेल्या २ महिन्यांत जामिनावर कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांचे सोशल मीडियावर त्यांच्या टोळ्यांनी जंगी स्वागत केले. पेालिसांना आव्हान देणाऱ्या पोस्ट, रीलसह गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले गेले. ‘लोकमत’ने १० ऑगस्ट रोजी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सोशल मीडियावर गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या टवाळखोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गतवर्षी शहरात लुटमार, सामान्यांवर हल्ले, व्यापारी, विक्रेत्यांवर हल्ल्यांसह खंडणी मागणाऱ्या टोळ्यांवर एमपीडीए, मकोका अंतर्गत कारवाई करून हर्सूल कारागृहात टाकण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत यातील बहुतांश आरोपींना जामीन मंजूर होत ते बाहेर आले. गेल्या सात महिन्यांत शहरातील ९२१, तर जिल्ह्यातून ५४७ गुन्हेगार बाहेर आले. जामिनावर सुटल्यानंतरही त्यांनी गुंडगिरी सुरू केली. काहींनी थेट पोलिसांवर हल्ले केले तर काही व्यापाऱ्यांना खंडणी मागत पर्यटनस्थळांच्या सहलीवर गेले. मात्र, पोलिस या सगळ्यांपासून अनभिज्ञ राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रेशनमैत्रिणीवर हल्ला करणारा सय्यद फैजल ऊर्फ तेजा सय्यद एजाज (रा. किलेअर्क) हा कारागृहाबाहेर येताच अनेकांनी तेथेच रील बनविले. सोशल मीडियावर शस्त्रांसह त्याच्या पोस्ट करत स्वागताचे स्टेटस पडले. टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख (रा. भारतनगर) याने कारागृहाबाहेर येताच जल्लोष केला. त्याचे हर्सूल कारागृहातील संपर्काच्या खोलीतील, न्यायालयातून बाहेर पडतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले गेले. ‘लोकमत’ ने १० ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करत ही बाब उघडकीस आणली होती.
सायबर पोलिसांना सूचना केल्यासोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे व्हिडीओ, रील आहेत. असे कृत्य करणाऱ्यांविरोधात त्यांच्या पोस्ट शोधून कारवाई करण्याच्या सूचना सायबर पोलिसांना केल्या आहेत. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.- रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त, गुन्हे व सायबर विभाग