धारदार शस्त्र घेऊन रील व्हायरल; हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनी काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:39 IST2025-02-05T17:38:04+5:302025-02-05T17:39:46+5:30
काही तरुण हुल्लडबाजी करून हातात धारदार शस्त्र, छऱ्याची बंदूक घेऊन त्याची रील तयार करीत होते.

धारदार शस्त्र घेऊन रील व्हायरल; हुल्लडबाज तरुणांची पोलिसांनी काढली धिंड
पाचोड : हातात धारदार शस्त्र, छऱ्याची बंदूक घेऊन रील तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. पाचोड येथील ८ जणांची पोलिसांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता गावातून धिंड काढली.
पाचोड व पाचोड परिसरातील काही तरुण हुल्लडबाजी करून हातात धारदार शस्त्र, छऱ्याची बंदूक घेऊन त्याची रील तयार करीत होते. तसेच ही रील सोशल मीडियावर व्हायरल करून जनतेत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होते. याबाबत माहिती मिळताच मंगळवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील यांच्या पथकाने विनोद राजकर, कृष्णा राजकर, विजय राऊत, विशाल शेळके, आदिल वाघ, नचिकेत पालवे, अंबादास वाघ, करण शेळके या ८ तरुणांना ताब्यात घेतले.
तरुणांची काढली धिंड
त्यानंतर पोलिसांनी आठही तरुणांची पाचोड बस स्थानकापासून पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली. काही वेळाने तरुणांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.