रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल

By मुजीब देवणीकर | Published: December 18, 2023 02:49 PM2023-12-18T14:49:52+5:302023-12-18T14:51:51+5:30

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करीत असत. अलीकडे मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे.

real estate boom; Record break 35 thousand crore revenue to the state | रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल

रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल

छत्रपती संभाजीनगर : जमीन, फ्लॅट, प्लॉट विक्रीच्या व्यवसायात मागील काही वर्षांच्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेकॉर्ड ब्रेक उच्चांक पाहायला मिळतोय. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आतापर्यंत ३५ हजार ८५८ कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मार्चअखेरपर्यंत यामध्ये आणखी बरीच वाढ होईल.

बाजारात प्रचंड मंदी असल्याचे बाराही महिने बोलले जाते. जीएसटीने कंबरडे मोडले, दाेन हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने बाजारात पैसा नाही, अशी कितीतरी कारणे अर्थतज्ज्ञांकडून दिली जातात. मात्र, जमीन खरेदी- विक्री, लहान- मोठे फ्लॅट, प्लॉट विक्रीच्या व्यवसायात अजिबात मंदी नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात हा व्यवसाय फळाला आल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलावरून निदर्शनास येते. चालू आर्थिक वर्षात १३ लाख ४० हजार ४४६ दस्तांची नोंदणी झाली. त्यातून राज्य शासनाच्या तिजोरीत ३५ हजार कोटींचा महसूल आला. मागील दहा वर्षांची आकडेवारी बघितली तर एवढी उच्चांकी आकडे डिसेंबर महिन्यात कधीच गाठलेला नव्हता. आर्थिक वर्ष संपायला अजून जवळपास साडेतीन महिने शिल्लक आहेत. नवीन वर्षात रेडीरेकनर दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे मार्चपर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्रीचे व्यवहार होण्याची दाट शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

गुंतवणूकदारांचा कल वाढला
काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करीत असत. अलीकडे मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: जमीन, प्लॉट खरेदीकडे कल आहे आज घेतलेली जमीन काही महिन्यानंतर अधिक पैसे देते. जमिनींचे दर दररोज आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

दहा वर्षांतील दस्त नोंदणी
वर्षे- दस्तनोंदणी- प्राप्त महसूल (आकडे कोटीत)

२०१३-१४-२३,३०,३७३-१८,६६६.००
२०१४-१५-२२,९७,९२९- १९,९५९.०९
२०१५-१६-२३,०८,८०९-२१,७६७.०१
२०१६-१७-२१,२२,५९१-२१,०५२.६५
२०१७-१८-२१,९३,१४९-२६,४७०.८१
२०१८-१९-२२,९१,९२२-२८,५७९.५९
२०१९-२०-२८,२२,९६१-२८,९८९.२९
२०२०-२१-२७,६८,४९३-२५,६५१.६२
२०२१-२२-२३,८३,७१२-३५,१७१.२५
२०२२-२३-१३,४०,४६४-३५,८५८.५४

फ्लॅटपेक्षा जमिनीत उलाढाल
रिअल इस्टेटमध्ये नुकसान कधीही नसते. नफा थोडासा कमी- जास्त होऊ शकतो. सुरक्षित क्षेत्र आहे. मागील काही वर्षांमध्ये होत असलेले हायवे, समृद्धीमुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आमूलाग्र सुधारणा झाली. अर्बन क्षेत्र वाढू लागले, त्याचे हे परिणाम आहेत. फ्लॅटपेक्षा जमिनीत उलाढाल मोठी आहे.
- रमेश नागपाल, नरेडको अध्यक्ष.

Web Title: real estate boom; Record break 35 thousand crore revenue to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.