'कर घ्या; पण रस्ते, पाणी द्या'; सातारा आणि देवळाईतील वसाहती खड्डे अन् चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:36 IST2019-08-16T17:34:02+5:302019-08-16T17:36:35+5:30
रस्ते चिखलमय झाले असून, पायी चालणेही अवघड झाले आहे.

'कर घ्या; पण रस्ते, पाणी द्या'; सातारा आणि देवळाईतील वसाहती खड्डे अन् चिखलमय
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : महापालिकेने दुर्लक्ष केलेल्या सातारा, देवळाईतील विविध वसाहतींमधील रस्त्यांवर खड्डे आणि चिखल झाला असून, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
मनपात समाविष्ट झालेल्या परिसरात कोणताच निधी उपलब्ध झालेला नाही, जुन्याच निधीतून पाच रस्त्यांची कामे चालू आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सातारा, देवळाई परिसरातील कच्चे रस्ते चिखलमय झाले असून, पायी चालणेही अवघड झाले आहे. चिखल तुडवतच नागरिकांना चालावे लागत आहे. देवळाईच्या नाईकनगर, माऊलीनगर, राजनगर, तसेच अरुणोदय कॉलनी, दिशा घरकुल, म्हाडा परिसराचा रस्ता, छत्रपतीनगर, आलोकनगर, पृथ्वीनगर, आयप्पा मंदिर रोड, लक्ष्मी कॉलनी, पेशवानगर, आमदार रोड, संग्रामनगर, ठाकरेनगर, हायकोर्ट कॉलनी, एकतानगर, सातारा गाव, पटेलनगर, शाहनगर, सुधाकरनगर यासह विविध रस्त्यांवरून जाताना कुठेही शहर असल्याचे जाणवत नाही. मनपात असूनही ग्रामीण भागातील शेतवस्तीवर चिखलमय पाऊलवाटा असल्याचे जाणवत आहे. नागरिकांना घरापर्यंत सुरक्षित जाता यावे, असे रस्ते मनपाने द्यावेत, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल, हरिभाऊ राठोड, पंकजा माने, रणजित ढेपे, सलमान पटेल, रमेश पवार आदींंनी केली आहे.
कर घ्या; पण रस्ते, पाणी द्या
सातारा, देवळाईत ज्या पद्धतीने कर लावून वसुलीचा बडगा राबविला जात आहे, त्याला नागरिकांचा विरोध नाही. कर घ्या; परंतु रस्ते, पाणी या महत्त्वाच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्याची गरज आहे. जुलैअखेरीस ३ कोटी ७० लाखांचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. जायकवाडीतील पाणीसाठा ६० टक्क्यांच्या वर गेला असल्याने शहराप्रमाणेच सातारा, देवळाईकरांची तहान भागवावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, सोमीनाथ शिराणे, जमील पटेल, शेख झिया, गणेश साबळे, जिजा काळे, पोपटराव सोळनर आदींनी केली आहे.