रेल्वेचे लाइव्ह लोकेशन पाहून मित्रालासोबत घेतले;काही कळायच्या आत समोर उडी घेत जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:19 IST2022-04-21T15:15:35+5:302022-04-21T15:19:08+5:30
प्रेमप्रकरणातून आत्महत्या, मित्राला फिरून येऊ म्हणत गाठला रेल्वेरूळ

रेल्वेचे लाइव्ह लोकेशन पाहून मित्रालासोबत घेतले;काही कळायच्या आत समोर उडी घेत जीवन संपवले
औरंगाबाद : फिरून येऊ म्हणत मित्राला घरातून काढत रेल्वेरुळांवर नेले. तेथे मित्राच्या समोरच धावत्या रेल्वेखाली उडी घेत सीएचा अभ्यास करणाऱ्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली. रूपेश दिगंबर देवडे (२४, ह.मु. अजबनगर, औरंगाबाद, मूळ रा. म्हसोबा गल्ली, सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
रूपेश शिक्षणात हुशार असल्यामुळे त्याला आईवडिलांनी सीए होण्यासाठी औरंगाबादला पाठवले होते. अजबनगर भागात नीलेश कोठाळे या विद्यार्थ्यासोबत किरायाच्या रूममध्ये तो राहत होता. मंगळवारी रात्री रूपेशच्या हट्टापायी दोघांनी मेसमध्ये एकाच ताटात जेवण केले. त्यानंतर, नीलेशला सोडून रूपेश त्याचा दुसरा मित्र अश्वजित जाधवकडे गेला. त्याला चल फिरून येऊ, असे म्हणत दोघेही दुचाकीवरून संग्रामनगर उड्डाणपुलाच्या दिशेने गेले. रूपेश लघुशंकेची थाप मारून अश्वजितला रेल्वेरुळांच्या दिशेने घेऊन गेला. त्या ठिकाणी रेल्वे येताच त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार संजय शिरसाठ करीत आहेत.
आत्महत्येसाठी पाहिले रेल्वेचे लोकेशन
रूपेशने आत्महत्या करण्याचे ठरविले होते. दुचाकीवर जात असताना त्याने मित्र अश्वजितला 'आज माझा शेवटचा दिवस आहे' असे बोलला. त्यावर अश्वजितने काहीही बोलू नको म्हणत त्याचे वाक्य सहज घेतले. रेल्वेसमोर उडी घेण्यापूर्वी त्याने मोबाइल बाजूला फेकला. उपस्थितांना जेव्हा रूपेशचा मोबाइल सापडला, त्यावेळी त्याच्या मोबाइलमध्ये रेल्वेचे लाइव्ह लोकेशन आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.