"किरणांची तेजाशी भेट!"; वेरूळ लेणीतील अद्भुत नजारा पाहण्यास पर्यटकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 20:18 IST2026-03-11T20:18:15+5:302026-03-11T20:18:41+5:30
वेरूळ लेणीत किरणोत्सव! तथागत गौतम बुद्धांची मूर्ती सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली

"किरणांची तेजाशी भेट!"; वेरूळ लेणीतील अद्भुत नजारा पाहण्यास पर्यटकांची गर्दी
खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर): जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील १० क्रमांकाच्या चैत्यगृहात बुधवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीवर सूर्याची किरणे पडल्याने एक अद्भूत 'किरणोत्सव' सोहळा संपन्न झाला. वास्तुकला, स्थापत्य आणि खगोलशास्त्राचा हा अनोखा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
अंधारलेल्या लेणीत तेजाचा संचार
दहा क्रमांकाच्या लेणीत दरवर्षी १० आणि ११ मार्च रोजी हा चमत्कार पाहायला मिळतो. बुधवारी दुपारी ४:१० वाजता सूर्याची किरणे लेण्याच्या वरच्या बाजूला असलेल्या गवाक्षातून थेट गाभाऱ्यात शिरली. यामुळे काही क्षणातच अंधारलेली लेणी उजळून निघाली आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती तेजाने न्हाऊन निघाली. हा तेजाळलेला चेहरा पाहताना पर्यटक मंत्रमुग्ध झाले होते.
वेरूळ लेणीत किरणोत्सव! तथागत गौतम बुद्धांची मूर्ती सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली #chhatrapatisambhajinagar#ElloraCavespic.twitter.com/Smz5h3J275
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 11, 2026
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मंगळवारी लेणी बंद असल्याने पर्यटकांना हा सोहळा पाहता आला नव्हता, परिणामी बुधवारी मोठी गर्दी झाली होती. वाढती गर्दी लक्षात घेता खुलताबाद पोलिसांनी लेणी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस हवालदार प्रमोद साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याचे नियोजन केले. हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची एकच धावपळ उडाली होती.