रसूलभाई महिन्याभरातच निवारागृहातून पुन्हा रस्त्यावर; मनपाचा बेघर दिनाचा नुसताच तामझाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:33 IST2025-12-10T19:33:16+5:302025-12-10T19:33:30+5:30
महानगरपालिकेची बेघर दिनाची मोहीम ही फक्त एक दिवसापुरती, फोटोसेशनपुरती होती का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

रसूलभाई महिन्याभरातच निवारागृहातून पुन्हा रस्त्यावर; मनपाचा बेघर दिनाचा नुसताच तामझाम
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : जागतिक बेघर दिनानिमित्त ९ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेतर्फे शहरात मोठ्या प्रमाणावर शोध व पुनर्वसन मोहीम राबवून काही बेघर नागरिकांना निवारागृहात आसरा दिला होता. त्यात मोंढा नाका उड्डाणपुलाखाली राहत असलेले ७० वर्षीय रसूल शहा यांनाही हक्काचे घर मिळाल्याची अनुभूती त्यांना आली होती. अर्धांगवायू झाल्यानंतर मुलांनी व पत्नीने त्यांना काही दिवसांपासून रस्त्यावर आणून सोडले होते. तेव्हापासून गेले अनेक महिने फूटपाथवरच आयुष्य काढत असलेल्या शहांना चार भिंतींचा आसरा मिळाला होता. मात्र, दोनच महिनाभरातच ते पुन्हा आपल्या जुन्या ठिकाणी उड्डाणपुलाखाली आले. त्यामुळे मनपाच्या निवारागृहातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.महानगरपालिकेची बेघर दिनाची मोहीम ही फक्त एक दिवसापुरती, फोटोसेशनपुरती होती का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने जागतिक बेघर दिनानिमित्त (१० ऑक्टोबर) बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ९ ऑक्टोबरला शहरात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. या विशेष मोहिमेत पथकाने रात्री रसूल शहा यांच्यासह १६ जणांना शहरातील विविध निवारागृहात दाखल करण्यात आले होते. काही दिवस शहा मोतीकारंजा येथील निवारागृहात राहिल्यानंतर ते पुन्हा रस्त्यावर दिसून आले आहेत. निवारागृहातील परिस्थिती राहण्यायोग्य नसल्याचे तसेच जेवण मिळत नव्हते, असे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुनर्वसन व्यवस्थेतील अनेक त्रुटी या प्रकरणावरून पुढे येत आहेत.
जेवणच मिळाले नाही
‘लोकमत’ने रसूल शहांशी संवाद साधला असता त्यांनी निवारागृहातील परिस्थिती समाधानकारक नसल्याचे सांगितले. जेवण चांगले मिळत नाही, नीट काळजी घेतली जात नसल्यामुळे मी परत आलो. यासह जेवणात फक्त भातच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यावरची कठीण परिस्थिती असूनही ते पुन्हा त्याठिकाणी परतले, हे विशेष.
माहिती घेतो
रसूल शहा नेमके आमच्या निवारागृहातून कधी गेले, याबाबत माहिती नाही. ते नातेवाइकांकडे गेल्याचे मला सांगण्यात आले होते. माहिती घेऊन कळवतो.
-डॉ. जीवन पटेल, मोतीकारंजा निवारागृह
किती जण अजूनही निवारागृहात?
बेघर दिनाला छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल, मोंढा, महावीर चौक, वसंतराव नाईक चौक याठिकाणी विशेष शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यातून मिळालेल्या बेघरांना मोतीकारंजा, एन-६ येथील निवारागृहांमध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, त्यातील किती जण अजूनही तेथे राहत आहेत हा सवाल रसूल शहा यांच्या अनुभवावरून उपस्थित होत आहे.