पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३५ विद्युत खांब कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:03 IST2025-05-22T12:03:09+5:302025-05-22T12:03:46+5:30
अवकाळी पावसाने आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला.

पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३५ विद्युत खांब कोसळले
छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने गेल्या आठवडाभरात छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागात महावितरणचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात आठवडाभरात तब्बल ६३५ विद्युत खांब कोसळले. रोहित्रांचेही नुकसान झाले. त्यामुळे अनेक गावे अंधारात बुडाली. मात्र, युद्धपातळीवर काम करून सर्व खांब व रोहित्रे पुन्हा उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
अवकाळी पावसाने आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत केला. छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात उच्च दाब वाहिनीचे ११ व लघुदाब वाहिनीचे ३० विद्युत खांब कोसळले, तर तीन वितरण रोहित्रांची हानी झाली. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात उच्चदाब वाहिनीचे २१३ व लघुदाब वाहिनीचे ३८१ विद्युत खांब कोसळले, तर २१ रोहित्रांची हानी झाली. सर्व खांब व रोहित्र उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे महावितरणने सांगितले.
रात्रभर ३८ किमी पायपीट करून वीजपुरवठा पूर्ववत
वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे ३३ केव्ही लोणी वाहिनीवर जरुल फाटा, खंडाळा, कोल्ही येथे वीज पडून पिन इन्सुलेटर बिघडले. त्यामुळे शिऊर, लोणी व भादली या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी लगेचच युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रभर पावसात ३८ किमी लांबीच्या या वाहिनीची चिखल तुडवत तपासणी केली. रात्रीच्या अंधारातही बॅटऱ्यांच्या उजेडात काम सुरूच होते. प्रत्येक विद्युत खांबाची पाहणी केली. त्यात ३५ पिन इन्सुलेटर खराब झालेले आढळले. ते बदलून ४० गावांतील सुमारे १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी दीड वाजता सुरळीत केला.