मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस; पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:43 AM2019-07-27T11:43:26+5:302019-07-27T11:46:31+5:30

शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा 

Rain in Marathwada; Revival of crops | मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस; पिकांना संजीवनी

मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस; पिकांना संजीवनी

googlenewsNext
ठळक मुद्देकाही भागांतील पेरण्या पावसाअभावी रखडल्या

औरंगाबाद : मराठवाड्यात अद्यापपर्यंत चांगला दमदार पाऊस पडलेला नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मात्र, शुक्रवारी बीड व नांदेड जिल्हा वगळता जवळपास मराठवाड्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, कोठेही पाऊस पडल्याची नोंद नाही. मराठवाड्यात पडलेल्या या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नांदेडात किनवट व हदगाव तालुक्यात जोर
नांदेड : गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर नांदेड शहर व जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली़ हा भीज पाऊस पिकांना संजीवनी देणारा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली़ २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक ३८़३३ मि़मी़ तर त्या खालोखाल किनवट तालुक्यात २७़२४ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ 
पावसामुळे कौठा ता़ कंधार मार्गे जाणाऱ्या नांदेड एसटी महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे शुक्रवारी हाल झाले़ निवघा बाजार परिसरातही कालपासून सतत रिमझिम पाऊस सुरू आहे़ बहाद्दरपुरा, कंधार, किनवट, हदगावसह नांदेड शहरात पावसाची रिपरिप सुरू होती़ शुक्रवारी दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही़ दि़२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पडलेला तालुकानिहाय पाऊस असा (सर्व आकडे मि़मी़मध्ये) - नांदेड १़६२, मुदखेड ६़६७, अर्धापूर १२़३३, भोकर १४़५०, उमरी १२़३३, कंधार ०़५०, लोहा ०३़३३, माहूर १६़५०, हदगाव २४़८५, हिमायतनगर ३८़३३, देगलूर ००़३३, बिलोली २़२०, धर्माबाद १५़६७, नायगाव ५़८०, मुखेड ०़ एकूण १८२़१२ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ सरासरी ११़३८ मि़मी़ पाऊस जिल्ह्यात झाला़ 

जालन्यात पावसाची हजेरी 
जालना : जालना शहरासह जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, मंठा शहर व परिसरात तसेच भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे शुक्रवारी सायंकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जालना शहरात आठवडाभरानंतर पावसाने सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान चांगली हजेरी लावली.
 टेंभुर्णी परिसरात मात्र, सायंकाळी दमदार पाऊस झाल्याने परिसरातील पिकांना जीवदान मिळाले आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. अंबड, घनसावंगी जालना शहरासह तालुक्यात गेल्या आठवड्यात रिमझिम पाऊस झाला आहे. पावसाअभावी खरिपातील पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली होती. मात्र, या हलक्या पावसामुळे किमान पिके वाचणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. जिल्ह्यात ९२ टक्के खरिपाची पेरणी झाली असून, मका पिकाला यंदा लष्करी अळीने पोखरले आहे. पाठोपाठ मूगाची वाढही खुंटली असून, यंदा मूग, तूर या कडधान्याच्या पेरणीचा टक्काही घसरला आहे. 

परभणी जिल्ह्यात मध्यम पाऊस
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़ परभणी शहरात गुरुवारी रात्री ९़३० वाजेच्या सुमारास हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला़ १़७५ मिमी पावसाची महसूल विभागाकडे नोंद झाली़ याशिवाय जिंतूर तालुक्यात १४़५० मिमी पाऊस झाला. सेलू तालुक्यात ६़४० मिमी पावसाची नोंद झाली़ शुक्रवारी सायंकाळी ७़३० च्या सुमारास जवळपास मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली़ रात्री ८़३० वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती़ गंगाखेड शहर व परिसरात रात्री ८ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर पूर्णा शहर व परिसरात सायंकाळी ७ च्या सुमारास पाऊस झाला़ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४२.१० मिमी पाऊस झाला असून मोठा पाऊस झालेला नाही़ 

उस्मानाबादेत रिमझिम
उस्मानाबाद :  जुलै महिना संपत आला तरी अद्याप उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आजही दुष्काळी परिस्थिती कायम आहे. दम्यान, शुक्रवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी चार वाजेदरम्यान उस्मानाबाद शहरामध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटे रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाची नोंद ९ मिमी एवढी झाली. सायंकाळी उमरगा, येणेगूर परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या.

हिंगोलीत ठिकठिकाणी पाऊस
हिंगोली : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे  चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. २५ जुलै रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या तर कुठे धो-धो पाऊस झाला. हिंगोली शहरासह जिल्हाभरात सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला. २६ जुलै रोजी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील विविध परिसरात पाऊस झाला. हिंगोली शहरासह जिल्ह्यात सर्वच भागात रिमझिम पाऊस झाला.

पाटोदा महसूल मंडळातील गावांत १० टक्के पेरण्या
१९७२ नंतर पहिलीच वेळ
पाटोदा (जि. बीड)  : अंबाजोगाई तालुक्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखले जाणारे पाटोदा ममदापूर महसूल मंडळ मागील तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे वाळवंट बनत आहे. यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा महसुल मंडळातील १९ गावांपैकी ममदापुर, पाटोदा, देवळा, अकोला, तडोळा, दैठणा राडी, धानोरा बु.धानोरा खु., कोपरा, कुंबेफळ, तटबोरगाव अंजनपूर या १३ गावांमध्ये पेरणी सरासरी १० टक्के एवढी झाल्याचे कृषी विभागाचे सहाय्यक ए. जी. गाडे आणि ए. बी. पतंगे यांनी सांगितले. विशेष म्हणजे यापैकी १० गावात तर १ टक्कादेखील पेरा झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मंडळातील ६ गावांमध्ये पेरण्या ७० ते ८० टक्क्यांपर्यंत झाल्या आहेत. तर दोन महिन्यांपासून या १३ गावांच्या परिसरात पाऊसच पडलेला नाही. प्रशासनाकडून मात्र अद्याप साधी चौकशीसुद्धा करण्यात आलेली नाही. यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी पाटोद्याचे सरपंच बाळासाहेब देशमुख, उपसरपंच गोविंद जामदार, जि. प. माजी सदस्य अशोक उगले, अविनाश उगले,राहुल उगले आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Rain in Marathwada; Revival of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.