छत्रपती संभाजीनगर : ‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ अथवा ॲपद्वारे रेल्वेचे तत्काळ तिकीट बुक करताना काही सेकंदात तत्काळचे तिकीट संपल्याचे संदेश असत. मात्र, आता संकेतस्थळ किंवा ॲपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकीट सहज मिळण्यास मदत होत आहे.
भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत १ जुलैपासून आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. प्रारंभी वेबसाइट किंवा ॲपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या नियमितपणे रेल्वे प्रवास करणारे आपले खाते आधारशी जोडण्यावर भर देत आहेत. या नव्या प्रणालीमुळे आधारचे तिकीट ऑनलाइनद्वारे सहजपणे मिळत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
ओटीपी सांगा, तत्काळ तिकीट घ्याआता १५ जुलैपासून रेल्वेस्टेशनसह पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करतानाही वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणिकरण करणे आवश्यक असेल, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेस्टेशनवर रांगारेल्वेस्टेशनवर तत्काळ तिकिटासाठी दररोज सकाळी रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. दिवाळी, उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेल्या संख्येचा फायदा घेत अनेक एजंट तत्काळ तिकिटांची दुकानदारी करतात. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात. ओटीपी प्रमाणिकरणामुळे ही दुकानदारी बंद होण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे एजंटांचे काहीसे ‘टेन्शन’ वाढले आहे.