अमेरिकेचे कॉल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये 'डायव्हर्ट'; बनावट कॉल सेंटरचे 'गुजरात कनेक्शन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:13 IST2025-10-29T12:10:08+5:302025-10-29T12:13:17+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर धाड; २० तास चालले 'जंबो ऑपरेशन', कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

अमेरिकेचे कॉल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये 'डायव्हर्ट'; बनावट कॉल सेंटरचे 'गुजरात कनेक्शन'
छत्रपती संभाजीनगर : अमेरिकेतील नागरिकांना करचुकवेगिरीवर कारवाईसह विविध प्रकारांच्या योजना, कर्ज, डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा एमआयडीसी सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांच्या जंबो पथकाने सोमवारी (दि. २७) मध्यरात्री १:२० मिनिटांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यात देशभरातील विविध राज्यातील ११६ आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील ११९ लॅपटॉप व मोबाइलसह अन्य तांत्रिक, डिजिटल साधने असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती झोन-२ चे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.
मुख्य आरोपी भावेश प्रकाश चौधरी, भाविक शिवदेव पटेल, सतीश शंकर लाडे, वलय पराग व्यास, अब्दुल फारूक मुकदम शाह ऊर्फ फारुकी आणि जॉन (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात ) यांच्यासह ११६ आरोपी व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यात ९२ युवक आणि २४ मुली आहेत. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गीता बागवडे यांना चिकलठाणा औद्योगिक परिसरातील कनेक्ट इंटरप्रायजेस टी-७ एसटीपी १ या चारमजली इमारतीमध्ये बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांची परवानगी घेत बागवडे, उपनिरीक्षक राधा लाटे यांच्या पथकाने काॅल सेंटरवर छापा टाकला, तेव्हा या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना मोबाइल फोन, ई-मेल, एसएमएसद्वारे बनावट मेसेज टाकले जात होते. त्यात विशिष्ट क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या जात होत्या. संबंधित नागरिकाने संपर्क साधल्यानंतर हे काॅल सेंटरमध्ये ‘डायव्हर्ट’ करण्यात येत. त्यातून सेंटरमधील कामगार त्यांच्याशी अस्खलित इंग्रजीत संभाषण करीत. त्यात तडजोड करण्यासाठी मन वळवले जाई व नंतर कॉल डायलर व्यक्ती क्लोजर व्यक्तीकडे ‘कॉल ट्रान्स्फर’ करीत होता. पैशांची तडजोड ठरल्यानंतर अमेरिकन नागरिकांना ॲमेझॉन गिफ्ट कार्ड, ॲपल आयट्युन्स कार्ड, झेले, वेस्टर्न युनियन, इ. कार्ड विकत घेण्यास भाग पाडले जाई. कार्डचा नमूद कोड सांगितल्यानंतर कॉल सेंटर चालविणारी टोळी कार्डातील पैसे डॉलरच्या स्वरूपात साथीदाराच्या मदतीने त्यांच्याकडे वळते करीत होती. हे डॉलरमधील पैसे क्रिप्टो करन्सीत ट्रान्स्फर करीत. त्यानंतर हवालाच्या माध्यमातून भारतीय चलनामध्ये आणले जात असल्याचेही पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले. या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य पाच आरोपींसह एकूण ११७ जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
वर्षभरापासून सुरू होते सेंटर
के. एस. इंटरप्राईजेस नावाने वर्षभरापासून हे बनावट कॉल सेंटर सुरू होते. चार मजल्यांच्या इमारतीत तळमजल्यावर दोन हॉल आणि दुसऱ्या मजल्यावरील एका हाॅलमध्ये हा प्रकार सुरू होता. याच इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर घरमालक राहतात. ते अनेक वेळा दोन्ही मजल्यांवर जाऊन चौकशी करीत होते. दोन्ही मजल्यांवरील खिडक्यांना काळे पडदे लावण्यात आले होते. अमेरिकन वेळेनुसार दिवसा कॉल करण्यासाठी भारतीय वेळ ही मध्यरात्रीचीच होती. त्यामुळे रात्रभर कॉल सेंटरचे काम सुरू होते.
२० तास पोलिसांचे जंबो ऑपरेशन
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकला. झोन-२ चे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, झाेन -१ चे पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे, सायबरचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे, सिडकोचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पुंडलिकनगरचे अशोक भंडारे, हर्सूलच्या स्वाती केदार यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह शेकडो पोलिसांचा ताफा दिवसभर घटनास्थळी होता. मध्यरात्री १:२० वाजता सुरू झालेली कारवाई मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत चालली. घटनास्थळी प्रभारी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी भेट दिली. त्याशिवाय न्यायालयातही आरोपींना हजर करताना कशा पद्धतीने उपस्थिती असावी, याविषयीच्या सूचनाही पोलिस आयुक्त हिरेमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.