टोकाई कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये घुसून राडा; खंडणीसाठी दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:34 IST2025-02-21T13:33:03+5:302025-02-21T13:34:56+5:30
गाळप हंगाम सुरू झाल्यापासून वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे.

टोकाई कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये घुसून राडा; खंडणीसाठी दिली धमकी
वसमत ( हिंगोली) : टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांच्या केबिनमध्ये घुसून तिघांनी कारखाना चालवायचा असल्यास हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत कार्यकारी संचालकास मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली.
गाळप हंगाम सुरू झाल्यापासून वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. २० फेब्रुवारी रोजी कार्यकारी संचालक प्रल्हाद गायकवाड यांच्या कक्षात कोंडबा सटवाजी कदम ( रा. वर्ताळा) , गंगाधर लोकेवार ( रा. कुरुंदा), अरविंद जाधव ( रा. सोमठाणा) हे तिघे घुसले. मागील अध्यक्ष हप्ता देत असत, तुलाही जर कारखाना निट चालवायचा असेल तर आम्हाला सव्वा लाख रुपये हप्ता द्यावा लागेल. नाहीतर जीवे मारू अशी धमकी देत केबिनमध्ये गोंधळ घातला. खुर्च्या फेकून देत गायकवाड यांना खाली पाडून शिवीगाळ केली.
याप्रकरणी संचालक गायकवाड यांनी कुरुंदा पोलीस ठाणे गाठून सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्याकडे तक्रार दाखल केली. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कोंडबा सटवाजी कदम, गंगाधर लोकेवार, अरविंद जाधव या तिघांविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखर कारखान्यावरील राड्याची दुसरी घटना....
काही दिवसांपूर्वी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी यांना ऊसतोड का देत नाही या कारणावरून कारखान्यावर मारहाण झाली. त्यानंतर आता टोकाई चे कार्यकारी संचालक प्रल्हाद गायकवाड यांच्या कक्षात घुसून खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली.