पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:20 IST2024-12-13T19:19:52+5:302024-12-13T19:20:39+5:30

विद्यापीठातील व्याख्यानात राजेश मिरगे यांचे प्रतिपादन; शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली.

Punjabrao Deshmukh is the pioneer of a comprehensive social revolution; it is because of him that Kunbi is included in the 'OBC' category | पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

छत्रपती संभाजीनगर : अठरापगड घटकातील कृषक, कष्टकरी बहुजन समजाला ‘शिक्षण-कृषी व सामाजिक’ क्षेत्रातील समग्र समाजक्रांतीची प्रेरणा देणारे प्रणेते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक, अभ्यासक डॉ. राजेश मिरगे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले कला व सीतारामजी चौधरी वाणिज्य महाविद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके होते. ‘क्रांतीदर्शी डॉ. पंजाबराव देशमुख : समग्र समाज क्रांती व संविधानविषयक कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, प्रा. मधुकर रोडे, डॉ. राजेश मिरगे, डॉ. सचिन देशमुख, संयोजक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. छत्रभुज कदम, डॉ. कैलास पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. मिरगे म्हणाले, की १९१७ मध्ये खामगावात भरलेल्या शिक्षण परिषदेत राजर्षी शाहू महाराजांशी झालेली भेट आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. एक कर्ते सुधारक म्हणून पंजाबरावांनी धर्माची चिकित्सा व मानवी कल्याणाचा विचार मांडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील घटनासमितीत ‘मोरल सपोर्ट’ तर दिलाच, सोबतच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत सहभाग घेतला. केंद्रीय कृषिमंत्री, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, घटना समिती सदस्य अशा अनेक भुमिकांमधून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे योगदान कायम स्मरणात राहील. डॉ. दिलीप हाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. छत्रभूज कदम यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

पंजाबरावांमुळेचे कुणबी ‘ओबीसी’त
शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली. विदर्भातील शेतकरी कुणबी नोंदी करू लागले, मात्र ‘मराठा’ ही प्रदेशात्मक संज्ञा मराठवाड्यातील कुणब्यांनी लावली आणि ते आरक्षणापासून वंचित राहिले. डॉ. पंजाबराव यांचे म्हणने तेव्हाच समजून घेतले असते तर राज्यातील सर्व शेतकरी घटकांना हा लाभ मिळाला असता, असे डॉ. मिरगे म्हणाले.

Web Title: Punjabrao Deshmukh is the pioneer of a comprehensive social revolution; it is because of him that Kunbi is included in the 'OBC' category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.