महापालिका निवडणुकीसाठी १० कोटींची तरतूद; २९ प्रभागांसाठी किमान १५४० मतदान केंद्रे राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:05 IST2025-12-04T17:03:34+5:302025-12-04T17:05:01+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी १० कोटींची तरतूद; २९ प्रभागांसाठी किमान १५४० मतदान केंद्रे राहणार
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. १० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. २९ प्रभागांत किमान १५४० मतदान केंद्रे असण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा देणे, मंडप, सीसीटीव्ही आदी कामांसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. सर्वात अगोदर प्रभागरचना तयार करण्यात आली. त्यानंतर आता मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. एका प्रभागात जवळपास ४० ते ५० हजार मतदार आहेत. त्यामुळे २०१५ च्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या दुप्पट होणार आहे. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी आर्थिक तरतूद करुन ठेवली आहे. अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. यात मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा देण्याचे काम महापालिकेला करावे लागते. सीसीटीव्ही कॅमेरे, मंडप उभारणे आदी कामांचा समावेश असतो. तसेच यंदा मतमोजणी, ईव्हीएम ठेवण्यासाठीचे स्ट्राँगरूम या कामांसाठी तीन ठिकाणे निश्चित केली असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने मागील महिन्यातच मंडपासाठी २ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. याशिवाय अन्य कामांचेही हळूहळू तांत्रिक विभागाकडून नियोजन केले जात आहे. निवडणूक साहित्यासाठीही भांडार विभागाकडून निविदा निघेल.
११ लाख मतदार
महापालिका निवडणुकीसाठी ११ लाख मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर किमान १३०० ते १४०० मतदार येतील. १५४० केंद्रे गृहीत धरली आहेत. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६९९ मतदान केंद्रे होती. मतदारांची संख्या १० वर्षांत बरीच वाढली आहे.