पिकांसाठी दिवसा उच्च दाबाची वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रुमणे आंदोलनात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 19:22 IST2020-12-01T19:21:23+5:302020-12-01T19:22:42+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयासमोर रुमणे आंदोलन केले.

पिकांसाठी दिवसा उच्च दाबाची वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रुमणे आंदोलनात मागणी
औरंगाबाद : रात्री बॅटरी घेऊन शेतकऱ्यांवर पिकांना पाणी देण्याची वेळ येऊ नये यासाठी व त्यातून होत असलेले मृत्यू टाळण्यासाठी दिवसाउच्च दाबाची वीज मिळावी या मागणीसाठी मंगळवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयासमोर रुमणे आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा पूजा मोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. जुबिली पार्कजवळ आंदोलक शेतकरी जमा झाले. तिथून जवळच असलेल्या विद्युत वितरण प्रादेशिक कार्यालयाकडे त्यांनी कूच केली. स्वतः मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, शिवाजी हुसे, जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, कृष्णा साबळे आदींनी खांद्यावर रुमणे व हातात चाबूक धरून या मोर्चात सहभाग घेतला. दुपारी १.४५ वाजता मोर्चा प्रादेशिक कार्यालयावर धडकला. तेथे पोलिसांनी तो अडवला.
याठिकाणी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. प्रारंभी, पिकांना पाणी देताना शाॅक लागून मृत्युमुखी पडलेल्या व बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना दोन मिनिटे स्तब्धता बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर एक शिष्टमंडळ व्यवस्थापकीय संचालकांना भेटायला गेले. प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात संघटनेचे व मागण्यांचे फलक होते. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या अन्यायाचा निषेध यावेळी करण्यात आला.