औरंगाबाद : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी शहरातील विविध पक्षांच्या उमेदवारांनी काढलेल्या दुचाकी रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभांमुळे संपूर्ण वातावरण निवडणूकमय झाल्याचे दिसले. औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करून निवडून देण्याचे आवाहन केले. औरंगाबाद पूर्वमध्ये काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा, शिवसेनेच्या उमेदवार कला ओझा यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. भाजपाचे अतुल सावे, मनसेचे सुमित खांबेकर, राष्ट्रवादीचे जुबेर मोतीवाला यांनीही पदयात्रा काढल्या. मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद पाटील, काँग्रेसचे एम. एम. शेख, भाजपाचे किशनचंद तनवाणी यांनीही अखेरच्या दिवशी कॉर्नर सभांसह पदयात्रा काढून जोर लावला. औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचे जितेंद्र देहाडे, शिवसेनेचे संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद दाभाडे, भाजपाचे मधुकर सावंत, पँथर्स रिपाचे गंगाधर गाडे आदींसह विविध उमेदवारांनी पदयात्रा आणि कॉर्नर सभांद्वारे वातावरण ढवळून टाकले. १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. यात सर्वच पक्षांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी हजेरी लावली. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले होते. या वर्षीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी वापर करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा ‘हायटेक’ प्रयत्न केला.
प्रचार संपला
By admin | Updated: October 14, 2014 00:41 IST