प्रा. सुरेश पुरी यांची करुणाच समाजाला दिशा देणारी: ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:16 IST2025-05-20T14:15:13+5:302025-05-20T14:16:24+5:30

विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना हक्काचा आधार म्हणजे प्रा. पुरी यांचे घर होते.

Prof. Suresh Puri's compassion is what gives direction to society: Senior journalist Amar Habib | प्रा. सुरेश पुरी यांची करुणाच समाजाला दिशा देणारी: ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब

प्रा. सुरेश पुरी यांची करुणाच समाजाला दिशा देणारी: ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक औपचारिक शिक्षणासोबत अंत:करणात करुणा घेऊन जगत असेल तर समाजात सेवाभाव आपोआप रुजला जातो. जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी यांची करुणाच समाजाला दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी केले.

प्रा. सुरेश पुरी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शब्दवेध बुक हाउसच्या वतीने रविवारी अमर हबीब यांना ‘जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी लोकपत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चंद्रदेव कवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रल्हाद लुलेकर, दगडू लोमटे, प्रा. सुरेश पुरी, विजयमाला पुरी, प्रा. सुजाता गोरे हे उपस्थित होते.

देशात शेतकरी विरोधी कायदे अस्तित्वात आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय डबघाईला आला. महात्मा फुलेंच्या विचाराचे वारस देशात तयार झाले नाहीत, त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आजचा हा सोहळा म्हणजे करुणा आणि कृतज्ञतेचा आहे. प्रा. सुरेश पुरी यांचे कार्य हे समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्यामुळे आज देशाच्या विविध भागात अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत, असे अमर हबीब म्हणाले.

डॉ. लुलेकर यांनी विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना हक्काचा आधार म्हणजे प्रा. पुरी यांचे घर होते. केवळ औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांचे आयुष्य घडविले. अशाच सेवाभावातून समाजाची उभारणी होत असते. प्रा. सुरेश पुरी यांचे कार्य समाज बदलाचे आहे, असे गौरवोद्गार काढले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. चंद्रदेव कवडे यांनी केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, दगडू लोमटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन डॉ. राजू सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय गायकवाड यांनी केले. वैजनाथ वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी लेखक शाहू पाटोळे, प्रकाशक कुंडलिक अतकरे, वासुदेव मुलाटे, माहिती सहसंचालक श्याम टरके, ग्रंथपाल पांडुरंग अडसुळे, बळीराम किनाळकर, प्रेरणा दळवी, डॉ. हसन इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Web Title: Prof. Suresh Puri's compassion is what gives direction to society: Senior journalist Amar Habib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.