वसाहतींच्या समस्या: भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार? गाड्या रस्त्यातच ठेवून गाठावे लागते घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:12 IST2022-06-25T15:10:42+5:302022-06-25T15:12:43+5:30
शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे.

वसाहतींच्या समस्या: भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार? गाड्या रस्त्यातच ठेवून गाठावे लागते घर
औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील भाग्योदयनगरचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केलेली नाही. परिसरातील दुरवस्थेमुळे पावसाळ्यात अंगणात पावसाचे पाणी साचले असून सरपटणारे प्राणी रोज दृष्टीस पडत आहेत.
शहरापासून निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा परिसरातील दुरवस्थेमुळे भ्रमनिराश झाला आहे. काही जणांच्या तर येथील धोकादायक वळणाच्या रस्त्यांमुळे अपघात होऊन पायामध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आले आहेत. नागरिकांना चिखल तुडवत घर गाठावे लागते. पावसाळ्यात घरासमोर समुद्रासारखी बेटे तयार होत आहेत. साप, बेडूक घरात शिरतात. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटीचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात येत आहे. परंतु साताऱ्यातील नवीन वसाहतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यापर्यंत कुणाचेच लक्ष नाही. येथील प्रश्न मांडावे तरी कुणाकडे, हा प्रश्न अनुत्तरित आहे, असे नामदेव बाजड, रोहन पवार, शंकर म्हस्के आदींनी उपस्थित केला आहे.
आश्वासने पूर्ण कधी करणार?
मुलांना शाळेतून घरी नेताना किंवा कामावरून घरी जाताना अपघात होईल, हीच भीती मनात असते. महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने कधी पूर्ण होणार आहे.
- सुबोध पगारे, रहिवासी
घराभोवती तुंबते पाणी
पाहुण्याला घराचा पत्ता सांगताना पावसाळ्यात साचलेल्या पाण्याच्या पलीकडे बघितले, तर तेच आपले घर, असे म्हणावे लागते. आणखी किती दिवस महानगरपालिकेत असूनही दुर्लक्षित विभागासारखा परिचय द्यावा.
- प्रफुल्ल कुलकर्णी रहिवासी
वाहन पार्किंग घरापासून दूर
घरासमोर साचलेल्या सखोल पाण्याच्या डबक्यामुळे महागडी वाहनेदेखील घरापर्यंत नेऊ शकत नाहीत, ही आमची शोकांतिका आहे.
-पूजा कुलकर्णी, रहिवासी
कर घेता, मग सुविधा कधी देता?
तिजोरी भरण्यासाठी मनपाने गुंठेवारी तसेच कर वसुली केली आहे. नागरिकांना त्यातुलनेत सेवासुविधा कधी देणार, असा प्रश्न अनुत्तरित आहे.
- प्रवीण चव्हाण, रहिवासी