बोलणे बंद केल्याने अल्पवयीन मुलीसोबतचे खासगी छायाचित्र, व्हिडिओ व्हायरल; विकृत अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:09 IST2024-12-24T12:07:20+5:302024-12-24T12:09:11+5:30
कॅफेमध्येही अश्लील कृत्याचा व्हिडीओ केला अपलोड; गुन्हा दाखल होताच पसार; पंचवीस दिवसांनंतर विकृत अटकेत

बोलणे बंद केल्याने अल्पवयीन मुलीसोबतचे खासगी छायाचित्र, व्हिडिओ व्हायरल; विकृत अटकेत
छत्रपती संभाजीनगर: अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करत एका विकृत तरुणाने आक्षेपार्ह अवस्थेतले छायाचित्र, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सुनील बळीराम मिमरोट (२७, रा. रोहिदासनगर) हा पसार झाला होता. मुकुंदवाडी पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला शनिवारी रात्री उशिरा अटक केली.
एका १६ वर्षीय मुलीसोबत सुनील हे कृत्य केले. पीडिता शालेय शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी तिची सुनीलसोबत ओळख झाली होती. सुनीलने तिच्यासोबत मैत्रीचे नाटक करून संवाद वाढवला. मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी भेटण्यासाठी बोलावत होता. अल्लडपणात मुलीनेदेखील सुनीलवर विश्वास ठेवला. मात्र, त्याचे विचित्र वागणे पाहून मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले. याचा राग आल्याने सुनीलने मुलीला धमकावणे सुरू केले. तिच्यासोबत काढलेले छायाचित्र सर्व साेशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू केली. ही बाब कुटुंबाला कळल्यानंतर त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून त्याच्यावर विनयभंगासह बाललैंगिक अत्याचाराचा कलम ७४, ७५, ७८, ३५१(२), भारतीय न्याय संहितासह (बीएनएस) कलम ८, १२ बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२, सह कलम ६७(अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कॅफेमध्ये अश्लील कृत्य
सुनीलने पीडितेसोबतचे अनेक छायाचित्र सोशल मीडियाद्वारे सार्वजनिक करून तिच्यासह तिच्या कुटुंबालाही मनस्ताप दिला. सुनील एका कॅफेमध्ये कामाला होता. तेथे त्याने एका एका मुलीसोबत अश्लील कृत्य करून छुप्या पद्धतीने ते चित्रीत करून मुलीच्या बदनामीपोटी तो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर अपलोड करून धमकावणे सुरू केले होते.
हसनाबादवरून अटक
२८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच सुनील पसार झाला होता. सुनील मित्रांच्या मदतीसाठी हसनाबाद येथे येणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक शिवाजी तावरे यांनी तत्काळ पथकाला रवाना करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सुनीलने अन्य कोणासोबत असे प्रकार केले आहेत का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.