शालेय पोषण आहाराची रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंग; तिघांना अटक, एकजण फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:22 IST2025-02-04T19:21:55+5:302025-02-04T19:22:54+5:30
महाराष्ट्र शासनाच्या बालविकास प्रकल्पाच्या आहारातील धान्यासह पंजाब शासनाचे हजारो पोते धान्याचे रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंगमध्ये बाहेरील राज्यात विक्री

शालेय पोषण आहाराची रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंग; तिघांना अटक, एकजण फरार
छत्रपती संभाजीनगर : शालेय पोषण आहाराच्या काळाबाजार प्रकरणात अखेर तिसऱ्या दिवशी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पाेरेशनचा मालक संजय भगीरथमल, व्यवस्थापक मतिनोद्दीन गझनफरोद्दीन काझी, बलवंतसिंग चौहान व रोहित सिंग यांना आरोपी करण्यात आले.
पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शनिवारी करोडी शिवारातील भगीरथमलच्या या कंपनीवर कारवाई केली. महाराष्ट्र शासनाच्या बालविकास प्रकल्पाच्या आहारातील धान्यासह पंजाब शासनाचे हजारो पोते धान्याचे रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंगमध्ये बाहेरील राज्यात विक्री होत होते. या धान्याच्या लिलावास मनाई असताना शासनाच्या एका पोत्यातून २० ते २५ खासगी नावाने पाकिटे तयार केली जात होती.
केवळ बालविकास प्रकल्पाचीच तक्रार
तीन दिवसांपासून धान्याच्या काळाबाजार प्रकरणात तक्रार देण्याबाबत शासनाच्या विविध विभागांची टोलवाटोलवी सुरू होती. अखेर, सोमवारी कन्नडच्या बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर निरीक्षक रेखा लोंढे यांनी यात गुन्हा दाखल केला.
तक्रार एक, ऐवज कमी
गुन्ह्यात डेन्स तूरडाळ खिचडी प्रिमिक्सच्या १०० बॅग, बालकांसाठीचे मल्टिमिक्स प्रोटीनच्या ९५ बॅग, मिलेट बेस्ट प्रोटीनच्या १०, मूगडाळीच्या ९५ व तांदळाच्या २२० बॅग दाखविण्यात आल्या. उर्वरित सर्व ऐवज एफसीआयचा (भारतीय खाद्य महामंडळ) असल्याने बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीत उल्लेख टाळला.
प्राथमिक माहितीनुसार, पोषण आहाराचा ऐवज अंगणवाडीपर्यंत पोहोचला की नाही, बाजारात फेरविक्री झाली का, यासाठी त्यांचे डिस्पॅच क्रमांक मागवले आहेत. यात कोणत्या अंगणवाडीकडून माल गेला हे निष्पन्न होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.
तिघांना अटक
शालेय पोषण आहाराच्या काळा बाजार प्रकरणात गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पाेरेशनचा मालक संजय भगीरथमल पसार झाला आहे. तर त्याचा व्यवस्थापक मतिनोद्दीन गझनफरोद्दीन काझी व सुपरवायझर बलवंतसिंग चौहान व रोहित सिंग यांना अटक करण्यात आल्याचे दौलताबादच्या निरीक्षक रेखा लाेंढे यांनी सांगितले.
ऐवज वाढेल, आरोपींना अटक होईल
बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित मालाचीच तक्रार दिली. उर्वरित ऐवज एफसीआय असून, त्याची स्वतंत्र तक्रार होईल.
- नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त
काय आहे प्रकरण?
करोडी शिवारातील गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशन नावाने धान्य, कडधान्याची मिल आहे. मंगेश जाधव याचे मूळ मालक असून, ७ वर्षांपूर्वी मुंबईस्थित संजय अग्रवाल यांना ती दहा वर्षांच्या करारावर दिली. येथे शासकीय धान्याचा काळा बाजार होत असल्याचे उपायुक्त नितीन बगाटे यांना समजले. शनिवारी दुपारी ३ वाजता त्यांनी ६ निरीक्षक, ८ उपनिरीक्षकांसह छापा टाकला. तेव्हा महाराष्ट्र, पंजाब शासनाचे धान्य यंत्रात टाकून रिपॉलिशिंग सुरू होते.
काय आहे घोटाळा ?
-शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत धान्याचा शाळा, अंगणवाड्यांना पुरवठा होतो.
-याच्या विक्रीस, लिलावास मनाई आहे. पाकिटांवर शासनाचा लोगो, प्रकल्पाचा उल्लेख आहे. मात्र, मिलमध्ये याच विभागाच्या धान्याची हजारो पोती सापडली.
-त्या पोत्यांतील धान्याला यंत्राद्वारे रिपॉलिश करून खासगी कंपन्यांच्या पाकिटात भरले जाई.
या धान्य, पदार्थांचा काळा बाजार ?
मल्टी मिक्स सिरियल्स ॲण्ड प्रोटीन प्रिमिक्स शासनाच्या स्तनदा माता, गरोदर महिला व किशोरवयीन मुलींसाठीचे एनर्जी डेन्स मूग डाळ, खिचडी प्रिमिक्स, बालकांसाठीचे मल्टी मिक्स सिरियल्स ॲण्ड प्रोटीन प्रिमिक्स मिलेट बेस्ड पावडरची पाकिटे सापडली.
यामुळे संशय
-शासनातर्फे बंदी असलेला धान्याचा साठा खासगी कंपन्यांना कोणाच्या मान्यतेने पाठविला ?
-घटनास्थळी जळगावच्या विभागांना पाठविण्याचे परवाने आढळून आले. मग हे खासगी कंपन्यांच्या पाकिटात पॅक हा होत होते?