अजिंठा घाटात खासगी बसला शॉर्टसर्किटमुळे आग; ५० प्रवासी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:56 IST2025-12-15T15:54:38+5:302025-12-15T15:56:05+5:30
बंद पडल्याने मोठा अनर्थ टळला; दीड तासानंतर प्रवाशी दुसऱ्या बसने रवाना

अजिंठा घाटात खासगी बसला शॉर्टसर्किटमुळे आग; ५० प्रवासी बचावले
फर्दापूर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात शुक्रवारी रात्री १० वाजता रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बसमधून धूर निघू लागल्याने ५० प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बस रस्त्यात अचानक बंद पडल्याने मोठा अनर्थ टळला.
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून पुणे येथे जाणारी खासगी बस (एमएच १९ सीएक्स ३३३५) ही छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आली असता अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने बसमधून धूर निघण्यास सुरुवात झाली. काही क्षणात संपूर्ण बसमध्ये धूर झाल्याने आतील ५० प्रवाशांची एकच धांदल उडाली. काही अंतरावर चालकाने सावधानता बाळगत बसचा वेग कमी केला. त्यानंतर ही बस रस्त्याच्या बाजूला दगड लागल्यानंतर बंद पडली. त्यानंतर क्षणात सर्व प्रवाशी बसमधून खाली उतरले. बसचालकाने बसमधील अग्निशमन यंत्राचा वापर करून तातडीने आग आटोक्यात आणली.
रात्री थंडी असल्याने व घाटातच ही घटना झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. जवळपास दीड तासानंतर दुसरी खासगी बस जळगावहून घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर दुसऱ्या बसमध्ये सर्व ५० प्रवाशी पुण्याकडे रवाना झाले. या घटनेमुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
ट्रक नालीमध्ये उतरला
अजिंठा घाटात गेल्या काही दिवसांपासून घटनांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता एका खासगी बसमध्ये शॉर्टसर्किटने आग लागून धूर निघाल्याची घटना घडली होती. या घटनेत ५० प्रवाशी बालंबाल बचावले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आंध्र प्रदेशहून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो ट्रक नालीमध्ये उतरला. यामुळे मोठा अनर्थ टळला. रस्त्याच्या बाजूला ही घटना घडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे विविध घटनांमध्ये वाढ झाली आहे.