औरंगाबाद -कोरोनाकाळात इंग्रजी शाळा सोडून जि. प. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनापूर्वी २ लाख ४ हजार ७९७ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत पटावर होते. ती संख्या कोरोनाकाळात वाढून २ लाख ११ हजार ४३० झाली. तब्बल सहा हजार ६३३ पालकांनी खाजगी शाळांतून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित केले. एकीकडे पटसंख्या घटत असताना प्रवेशोत्सव, माझी शाळा सुंदर शाळा, आदर्श शाळा आदी उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालकांना आकर्षित करण्यात उपक्रमशील शाळा यशस्वी झाल्या आहेत.
औरंगाबाद तालुक्यात जिल्हा परिषद सातारा, माउलीनगर, बजाज गेटसह विविध उपक्रमशील शाळांना पालकांची पसंती मिळत आहे. तसेच गंगापूर, पैठण, वैजापूरसह विविध तालुक्यांतील उपक्रमशील शाळांतील गुणवत्तपूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थी संख्या वाढत आहे. कोरोनाकाळात ६ हजार ६३३ विद्यार्थ्यांची वाढ झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
म्हणून सोडली इंग्रजी शाळाजिल्हा परिषदेच्या सातारा, बजाज गेट येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले, भरमसाठ फी देऊनही योग्य सुविधा, वागणूक नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना पसंती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनात आणि शिक्षणातही मोठा फरक जाणवत आहे. शिवाय या शाळा विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेचीही तयारी करून घेत आहेत.
गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध कोरोना कालावधीमध्ये पालकांची इंग्रजी माध्यमाच्या ऐवजी मराठी शाळांमध्ये मूळ गावात जाण्याची इच्छा निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पोटतिडकीने विषय शिकवणारे शिक्षक, गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध असल्याने तसेच तेथे कोणत्याही स्वरूपाचा शुल्क भरण्याचा प्रश्न नसल्यामुळे पालक मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.-नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद
असे वाढले विद्यार्थी : तालुका - वाढलेले विद्यार्थीऔरंगाबाद -१००८कन्नड -७३०खुलताबाद -४४७गंगापूर -१४०३पैठण - ८५१फुलंब्री -४०३वैजापूर -९२६सिल्लोड -७०९सोयगाव -१५६