झाल्टा फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार गर्भवती ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:54 IST2018-08-31T18:52:32+5:302018-08-31T18:54:55+5:30
भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार गर्भवती महिला जागीच ठार झाली तर तिचा सासरा आणि तीन वर्षीय चिमुकला जखमी झाला.

झाल्टा फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार गर्भवती ठार
औरंगाबाद : भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार गर्भवती महिला जागीच ठार झाली तर तिचा सासरा आणि तीन वर्षीय चिमुकला जखमी झाला. हा भीषण अपघात बीड रस्त्यावरील झाल्टा फाट्याजवळ आज दुपारी घडला. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली.
सीमा इब्बू शेख (२५, रा. आडूळ) असे मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघातात तिचे सासरे शेख इब्राहिम शेख दगडू हे गंभीर जखमी झाले तर सीमाचा तीन वर्षीय मुलगा आसेफला किरकोळ मार लागला. या घटनेविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सीमा ही पाच महिन्यांची गर्भवती असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी ती आज दुपारी सासरे इब्राहिम आणि मुलगा आसेफ यांच्यासह आडूळ येथून औरंगाबादला मोपेडने येत होती. इब्राहिम हे मोपेड चालवीत होते तर त्यांच्यामागे सीमा आणि चिमुकला आसेफ होता. झाल्टा फाट्याजवळ ते असताना मागून वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या मोपेडला जोराची धडक दिली.
या अपघातात सीमाच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती घटनास्थळीच ठार झाली. या घटनेत तिच्या पोटातील बाळही दगावले. तर मोपेडचालक इब्राहिम यांना गंभीर दुखापत झाली तर आसेफला किरकोळ मार लागला. या अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी मदतीला धावले आणि त्यांनी तातडीने या घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत सीमाचे शव आणि जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले