'तुला चौथीही मुलगीच होणार', म्हणत गर्भवतीच्या पोटात पती, सासू-सासऱ्यांकडून लाथांचे प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:47 IST2025-01-27T18:46:51+5:302025-01-27T18:47:33+5:30

“आम्हाला आता मुलगी नको,” असे म्हणत पती, सासू सासऱ्यांनी केली मारहाण

Pregnant woman kicked in the stomach, saying she will have a fourth daughter; two-month-old fetus dies | 'तुला चौथीही मुलगीच होणार', म्हणत गर्भवतीच्या पोटात पती, सासू-सासऱ्यांकडून लाथांचे प्रहार

'तुला चौथीही मुलगीच होणार', म्हणत गर्भवतीच्या पोटात पती, सासू-सासऱ्यांकडून लाथांचे प्रहार

पैठण : तुला अगोदरच्या तीन मुली आहेत, आता चौथीही मुलगीच होणार.. असे म्हणून एका गर्भवती महिलेच्या पोटावर पती, सासू व सासऱ्याने लाथांचे प्रहार केले. या घटनेत पोटातील दोन महिन्यांचे भ्रूण मृत्युमुखी पडले. ही घटना पैठण तालुक्यातील नवगाव येथे घडली. या प्रकरणी गुरुवारी (दि. २३) तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवगाव येथील सोफिया फिरोज शेख (वय २५) या महिलेला तीन मुली असून, चाैथ्या वेळेस ही महिला गरोदर होती. १८ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सोफिया हिला पती फिरोज शेख, सासरा अत्कर शेख, सासू रफिया शेख यांनी, तुला अगोदर तीन मुली आहेत व आताही चौथी मुलगीच होणार असल्याचे म्हणून मारहाण सुरू केली. “आम्हाला आता मुलगी नको,” असे म्हणून या सर्वांनी गर्भवती असलेल्या सोफियाच्या पोटावर लाथा मारल्या.

यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोफियाला नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोटातील दोन महिन्यांच्या भ्रूणाचा मृत्यू झाला. प्रकृती बरी झाल्यानंतर सोफिया हिने पैठण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. यावरून गुरुवारी रात्री उपरोक्त तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय मदने करीत आहेत.

Web Title: Pregnant woman kicked in the stomach, saying she will have a fourth daughter; two-month-old fetus dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.