Prakash Ambedkar: 'नुरा कुस्ती खेळू नका, आखाड्यात या'; प्रकाश आंबेडकरांचे फडणवीसांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:34 IST2022-03-14T20:26:37+5:302022-03-14T20:34:08+5:30
Prakash Ambedkar: 'भाजपला सरकार पाडण्याची गरज नाही, सरकार आपोआप पडेल.'

Prakash Ambedkar: 'नुरा कुस्ती खेळू नका, आखाड्यात या'; प्रकाश आंबेडकरांचे फडणवीसांना आव्हान
औरंगाबाद: आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला. आज शहरात वंचित आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, पण ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी या मुद्द्यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.
ते म्हणाले की, सध्या राज्यात सध्या हिंदू-मुस्लमान राजकारण सुरू आहे. मुसलमानाची दाडी आणि हिंदूची शेंडी अशाप्रकारचे राज्यात राजकारण सुरू आहे. जनतेलाही अशाचप्रकारच्या राजकारणात रस आहे. दोष कोणाला देणार, निवडून गेले त्यांना की निवडून दिले त्यांना? मी निवडून दिले त्यांनाच दोष देतो.
फडणवीसांना थेट आव्हान...
सरकार पडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तसे संकेतही दिसत आहेत. भाजपला सरकार पाडण्याची गरज नाही, सरकार आपोआप पडेल. आजही नाना पटोले म्हणाले होते, आम्हाला सरकारसोबत जायचे नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखवून सरकारवर गंभीर आरोप केले. मी फडणवीसांना आव्हान देतो की, त्यांनी नुरा कुस्तीचे पैलवान होण्यापेक्षा आखाड्यातील पैलवान व्हावं. व्हिडिओचे पेनड्राइव्ह अध्यक्षांना देऊन काही उपयोग नाही. त्यांनी ते पेनड्राइव्ह जनतेच्या स्वाधिन करावेत, असे आंबेडकर म्हणाले.
संबंधित बातमी- 'औरंगाबाद पोलीस मुस्कानच्या घरी गेले अन्...', प्रकाश आंबेडकरांचा पोलीस आणि सरकारवर निशाणा