पूजा गावंडे हत्या प्रकरण: पोलिसांच्या दिरंगाईमुळे गेला जीव? मृत महिलेच्या मैत्रिणीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:19 IST2026-04-10T20:19:26+5:302026-04-10T20:19:59+5:30
पहिल्या पतीची आत्महत्या, दुसऱ्याने वाद होताच केला महिलेचा खून; दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले

पूजा गावंडे हत्या प्रकरण: पोलिसांच्या दिरंगाईमुळे गेला जीव? मृत महिलेच्या मैत्रिणीचा गंभीर आरोप
करमाड : पेट्रोल पंपावर काम करून आपल्या दोन मुलांची उपजीविका चालविणाऱ्या महिलेचा दुसऱ्या पतीने पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने गळा चिरून खून केला. ही घटना करमाडच्या गणपती मंदिराजवळील इंडियन पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९) दुपारी साडेबारा वाजता घडली. पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु. करमाड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पूजा गावंडे या गेल्या दीड महिन्यापासून करमाड शिवारातील एका पेट्रोल पंपावर नोकरी करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या गुरुवार सकाळी साडेनऊला पेट्रोल पंपावर कामासाठी आल्या. पंपावर ड्यूटी सुरू असताना दुपारी १२.३० वाजता अचानक त्यांचा पती दुचाकीवरून पंपावर आला. त्या उभ्या असलेल्या पंपाच्या स्टँडजवळ त्याने दुचाकी उभी करून पत्नी पूजाला पकडले. यावेळी पूजा यांनी आरोपीच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्यमने पूजा यांचा गळा पकडून पाठीत मागून चाकूने वार करून तिला जमिनीवर पाडले. यानंतर पूजाचा धारदार चाकूने गळा चिरला. यावेळी घटनास्थळी आवाज ऐकून पेट्रोल पंपाच्या मालकाने सत्यमला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाला. ही सर्व घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
आरोपी सत्यम पत्नी पूजाची हत्या करण्यासाठी सकाळी पेट्रोलपंपावर आला होता. परंतु, पंपावर गर्दी असल्याने तो परत गेला. दुपारी साडेबाराला पंपावर वाहनांची गर्दी नसताना त्याने पूजा ज्या पंपाच्या स्टँडवर ड्यूटी करीत होती, त्या ठिकाणी दुचाकी उभी केली. काही कळण्याच्या आत त्याने पूजाला पकडले. तिने पळण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकू काढून तिच्या पाठीवर वार करून तिला जमिनीवर पाडले. त्यानंतर त्याने तिचा निर्दयपणे गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याने कंबरेला चाकू खोचून दुचाकीवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाला ॲम्बुलन्सद्वारे घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले.
पूजाच्या पहिल्या पतीची आत्महत्या, दुसरा विवाह २०२५ मध्ये
पूजा हिचा पहिला विवाह चित्तेपिंपळगाव येथील सुदाम परसराम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झाला. काही घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी आत्महत्या केली. त्यानंतर पूजा हिने १५ नोहेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडे याच्यासोबत देवाची आळंदी पुणे येथे आर्य समाज संस्था येथे विवाह केला. पूजाला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु, दीड महिन्यापूर्वी पती सत्यम याच्यासोबत काही वाद झाल्याने ती काही दिवसांपूर्वी करमाडला राहण्यासाठी आली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, भारत निकाळजे, जमादार विजयसिंह जारवाल, प्रशांत नांदवे यांच्यासह फिंगर प्रिंटच्या टीमने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
आरोपीला दोन तासांत अटक
आरोपी सत्यम खून करून पसार झाला होता. तो पिंपरीराजा मार्गे कचनेरकडे पळून गेल्याची माहिती मिळताच करमाड ठाण्याचे पोलिस दादासाहेब ढवळे, सोपान डकले यांनी फिल्मीस्टाइलने आरोपीचा पाठलाग करीत त्याला कचनेर शिवारातून अटक केली.
...तर वाचला असता जीव, मैत्रिणीने फोडला घटनास्थळी टाहो
घटनेची माहिती मिळताच पूजा हिची मैत्रीण छाया गोरख वांगे हिने पूजाच्या आठवणीने टाहो फोडला. यावेळी त्यांनी सांगितले की, आरोपीने पूजासोबत नोव्हेंबर महिन्यात आळंदीत लग्न केले आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी आपसात बॉण्ड करून घटस्फोट देखील घेतला. पूजाने तीन महिन्यांपूर्वी करमाड ठाण्यात सत्यमच्या विरोधात तक्रार दिली होती. तसेच मंगळवारी (दि. ७) पुन्हा तक्रार देण्यासाठी ती सायंकाळी ५ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाण्यात होती. त्याच वेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर पूजाचा जीव वाचला असता, असा टाहो फोडून आज ती माझ्या वाढदिवसाला येणार होती, असे सांगितले.