विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी ‘ब्लॅकमेलिंग’; खंडणी स्वीकारताना टोळीचा म्होरक्या अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:50 IST2025-05-14T14:45:36+5:302025-05-14T14:50:01+5:30

१० लाखांच्या खंडणीची मागणी, सातारा पोलिसांकडून सापळा : टोळीचा मुख्य आरोपी जेरबंद, चार महिला पसार

Political official 'blackmailed' to withdraw molestation case; Arrested red-handed while accepting ransom | विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी ‘ब्लॅकमेलिंग’; खंडणी स्वीकारताना टोळीचा म्होरक्या अटकेत

विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी ‘ब्लॅकमेलिंग’; खंडणी स्वीकारताना टोळीचा म्होरक्या अटकेत

छत्रपती संभाजीनगर : विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेसह पाच जणांच्या टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा बंजारा ब्रिगेड सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रविकांत राठोड यांना खंडणी मागून बदनामीची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. राठोड यांनी याची पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर सोमवारी मुख्य आरोपी मुकेश प्रभात राठोड (रा. सुधाकरनगर) याला खंडणीची रक्कम स्वीकारताना सातारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पण, चार महिला पसार झाल्या.

११ एप्रिल रोजी एका महिलेने रविकांत यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, काहीच दिवसांत त्यांना २० लाखांची खंडणी मागणे सुरू केले. १ मे रोजी मुकेशने रविकांत यांना मित्रांच्या माध्यमातून भेटण्यासाठी बोलावले. त्याच दिवशी सायंकाळी रविकांत, प्रेमदास राठोड, मुकेश राठोड तिघे ए. एस. क्लब येथे भेटले. त्या भेटीत मुकेशने रविकांत यांना विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी त्याच्यासह पाच महिलांना १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट ठेवली. पैसे न दिल्यास सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर त्याने पाच महिलांसाेबत भेटून खंडणीची मागणी सुरू ठेवली.

तक्रारीची खातरजमा
मुकेश व अन्य महिलांच्या सततच्या धमक्यांना कंटाळून रविकांत यांनी ११ मे रोजी पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांच्याकडे तक्रार केली. ताठे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, नंदकुमार राठोड यांनी तक्रारीची शहानिशा केली असता, मुकेश खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाले.

खोट्या नोटांसह सापळा रचला
१२ मे रोजी मुकेशने पैशांसाठी तगादा सुरू केला. तडजोडीअंती वाळूजच्या हॉटेलमध्ये अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. पोलिसांनी सापळा रचला. बॅगमध्ये वर खऱ्या, तर खाली बनावट नोटा ठेवून रविकांत मुकेशला भेटायला गेले. हॉटेलमध्ये मुकेशने खंडणी घेताच दबा धरून बसलेल्या उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, अंमलदार दिगंबर राठोड, मनोज अकोले, दीपक शिंदे, दिनेश भुरेवाल यांनी धाव घेत मुकेशला पकडले. मुकेशसह खंडणी मागणाऱ्या अमृता गंगाधर चव्हाण (रा. देवळाई), आशा विनय राठोड, सविता राठोड, मनीषा मनोज राठोड (सर्व रा. वाळुज), किरण रुपसिंग चव्हाण (रा. बजाजनगर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. मुकेश पकडला जाताच अन्य आरोपी पसार झाले.

Web Title: Political official 'blackmailed' to withdraw molestation case; Arrested red-handed while accepting ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.