पोलिसांचा धिंड पॅटर्न सपशेल फेल : छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांकडून रोज नागरिकांची लुटमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:30 IST2025-10-25T15:28:59+5:302025-10-25T15:30:02+5:30
मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर नशेखोरांनी वकिलास सर्वांसमक्ष मारहाण करत लुटले, पैसे देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारावर प्राणघातक हल्ला

पोलिसांचा धिंड पॅटर्न सपशेल फेल : छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांकडून रोज नागरिकांची लुटमार
छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी पोलिसांनी धिंड पॅटर्नचा अवलंब केला. सामान्यांमधून त्याचे स्वागत झाले. मात्र, त्याचा गुन्हेगारांवर परिणाम झाल्याचे दिसत नाही. गेल्या तीन दिवसांत मुकुंदवाडीत नशेखोरीतून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच परिसरात सर्वांसमक्ष दोघांना लुटण्यात आले, तर बीड बायपासवर भररस्त्यात मैत्रिणीसोबत बोलणाऱ्या तरुणाच्या गळ्याला चाकू लावून त्याची सोनसाखळी हिसकावून नेली. या सततच्या लुटमारीमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ॲड. राजकिशोर राधेलाल कुशवाह (३५, रा. राजेंद्रनगर) यांचे २२ ऑक्टोबर रोजी अचानक गावी जाण्याचे ठरले. त्यामुळे २३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:३० वाजता ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर पोहोचले. तत्काळ तिकीट काउंटरजवळ बसलेले असताना अज्ञात चौघांनी अचानक त्यांच्याजवळ जात पैशांची मागणी केली. कुशवाह यांनी नकार देताच त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला करून मारहाण करत त्यांच्या खिशातील ६ हजार रुपये हिसकावून घेतले. कुशवाह त्यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करताच पळत जाणाऱ्या एकाने त्यांच्यावर दगड फेकून मारत जखमी केले. रुग्णालयात उपचार घेऊन कुशवाह यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तेथे गुन्हा दाखल केला.
डोळ्यात मिरची पुड टाकून लुटले
मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात कुशवाह यांना लुटल्याची घटना ताजी असतानाच २० ऑक्टोबर रोजी अशाच प्रकारे एका हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून लुटण्यात आले. बाबूराव गोंड (५६, रा. मुकुंदवाडी) यांचे रेल्वेस्थानक परिसरात हॉटेल आहे. २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता आरोपी प्रदीप राठोड व अन्य एकाने त्यांच्याकडे जात फुकट सिगारेट मागितली. गोंड यांनी नकार देताच राठोडने अन्य गुंडांना बोलावून घेत त्यांना मारहाण केली. त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्यांच्या खिशातून १७ हजार रुपये रोख रक्कम हिसकावून नेले. शिवाय पोलिसांकडे तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत गुंडांनी मजल मारली.
धारदार शस्त्राने वार करून तरुणाला लुटले
२० ऑक्टोबर रोजी भररस्त्यात मैत्रिणीसेाबत बोलत उभ्या तरुणावर दोन गुन्हेगारांनी धारदार शस्त्राने वार करून त्याच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून नेली. केक शॉप चालक असलेला रोनित वाघ (२४) हा २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जैन इंटरनॅशनल शाळेजवळ मैत्रिणीसेाबत बोलत उभा होता. यावेळी अचानक मागून आलेल्या दोन अज्ञातांनी त्याला मारहाण केली. शस्त्राने वार करत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून ते पसार झाले. सातारा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.