पोलिसांच्या सतर्कतेने भिंतीखाली दबलेल्या महिलेचे प्राण वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 19:45 IST2020-08-03T19:45:22+5:302020-08-03T19:45:22+5:30
पावसामुळे जुन्या मातीच्या घराची भिंत कोसळली

पोलिसांच्या सतर्कतेने भिंतीखाली दबलेल्या महिलेचे प्राण वाचले
औरंगाबाद : घराची मातीची भिंत पडल्यामुळे पत्रे आणि भिंतीखाली दबलेल्या ६० वर्षीय महिलेला जवाहरनगर पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने वाचविले. जखमी महिलेला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. ही घटना सोमवारी सकाळी ९:२० वाजता गारखेड्यातील काबरानगरात घडली. गोदाबाई बाबूराव गायकवाड असे जखमी महिलेचे नाव आहे.
गोदाबाई या पतीसह काबरानगरात राहतात. सोमवारी सकाळी त्यांचे पती कचरा वेचण्याच्या कामासाठी घराबाहेर पडले. यानंतर ९:२० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घराची भिंत पडली. यात छताचे पत्र्यावर भिंतीच्या विटा आणि माती पडली आणि त्याखाली गोदाबाई दबल्या. यावेळी शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. कुणी तरी जवाहरनगर पोलिसांना कॉल केला. गस्तीवरील हवालदार सय्यद फईम आणि गायके यांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेऊन शेजाऱ्यांच्या मदतीने पत्रे, माती आणि विटाखाली दबलेल्या गोदाबाई यांना तात्काळ बाहेर काढून रिक्षातून रुग्णालयात पाठविले. यामुळे वृद्धेचे प्राण वाचले.