क्रीडा संकुलातील २१ कोटींच्या घोटाळ्याचा तपास अडकला जुन्याच मुद्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:15 IST2025-01-04T16:14:18+5:302025-01-04T16:15:51+5:30

कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीतील इतर अधिकाऱ्यांची चौकशीच नाही, व्यवस्थापकाला मिळालेल्या ८० लाखांचे काय झाले? प्रश्न अनुत्तरितच; न्यायालयाने आरोपींच्या कोठडीची मागणी फेटाळली

Police investigation into Rs 21 crore scam gets stuck on 'old' issues | क्रीडा संकुलातील २१ कोटींच्या घोटाळ्याचा तपास अडकला जुन्याच मुद्यांवर

क्रीडा संकुलातील २१ कोटींच्या घोटाळ्याचा तपास अडकला जुन्याच मुद्यांवर

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलाच्या कोट्यवधीच्या घोटाळ्यात पोलिसांचा ‘शिळ्या’च मुद्यांवर तपास अडकला आहे. शिवाय, सोने, फ्लॅट, वाहनांव्यतिरिक्त तपासात कुठलीच प्रगती दिसत नसल्याने तपासाच्या अचानक मंदावलेल्या वेगामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

२१ डिसेंबर रोजी हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास वर्ग करण्यात आला. हर्षकुमार क्षीरसागर (२१) याने संकुलासाठी आलेल्या निधीतून २१.५९ कोटी रुपये लंपास केले. त्यातून त्याने आलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित चष्म्यांसह विदेश वाऱ्या केल्या. जवळपास २४ बँक खात्यांमध्ये ही रक्कम वर्ग झाली. कुटुंब, मैत्रिणीव्यतिरिक्त ही रक्कम त्याने कोणाकोणाला वर्ग केली, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. खासदार व माजी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही संकुलातील अधिकाऱ्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचा दावा केला. शासकीय अधिकारी, कर्मचारी असताना कंत्राटी कर्मचाऱ्याकडेच कोट्यवधीच्या निधीची जबाबदारी दिली, याबाबत मात्र पोलिसांकडून तपास होत नसल्याचे दिसून येत आहे.

सध्या पोलिस कोठडीत कोण ?
१. हर्षकुमार क्षीरसागर
२. अनिल क्षीरसागर (वडील)
३. मनीषा क्षीरसागर (आई)
४. हितेश आनंदा शार्दूल (मामा)

यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
-यशोदा शेट्टी (संकुलात कंत्राटी लिपिक)
-जीवन कार्यप्पा विंदडा (संकुलात मेस चालक, यशोदाचा पती)
-नागेश श्रीपाद डोंगरे (कर्मचारी पुरवणाऱ्या वेव मल्टिसर्व्हिसेसचा व्यवस्थापक)
-अर्पिता वाडकर (हर्षकुमारची मैत्रीण)

मुद्दे शिळेच, तपास का मंदावला ?
-शुक्रवारी न्यायालयाने अर्पिताच्या वाढीव कोठडीची पोलिसांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.
-मुंबईतील कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटमधून सोन्याचे दागिने, बिस्किटे जप्त करायचे बाकी असल्याची बाजू सरकारी पक्षाने मांडली.
-मात्र, आरोपी पक्षाने पहिल्या सहा दिवसांच्या कोठडीत त्याचा तपास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
-शिवाय, हर्षकुमार व अर्पिताच्या कुठलाही डिजिटल व्यवहार झाल्याचे पुरावेदेखील पोलिस सादर करू शकले नाहीत.
-हर्षकुमारसोबत कॅनॉटच्या फ्लॅटमध्ये राहणारा मित्र कुठे पसार झाला, हेही अद्याप कळले नाही.
जोड आहे

‘त्या’ जमिनीचे गूढ काय?
हर्षकुमारने लंपास केलेल्या शासनाच्या कोट्यवधींच्या निधीतून कमावलेली संपत्ती सील करण्यास सुरुवात झाली.
-यात हर्षकुमार, कुटुंब, मैत्रिणीच्या नावे असलेली ६ वाहने, ५ फ्लॅट, २ गाळे, सोन्याचे दागिने, ४२ लाखांच्या चष्म्यांचा समावेश आहे.
-विशेष म्हणजे जीवनने २०१८ मध्ये घेतलेल्या रो-हाउसचे कर्ज फेडण्यासाठी हर्षकुमारकडून प्राप्त १५ लाखांचा वापर केल्याने तेदेखील सील केले.

या मुद्यांचे काय?
-याचप्रमाणे नागेशला हर्षकुमारकडून ५० व ३० लाख, अशा दोन टप्प्यांत ८० लाख मिळाले.
-त्याचदरम्यान नागेश व अन्य सहा जणांनी वरूड काजीत कोट्यवधींची जमीन खरेदी केली. त्यासाठी हर्षकुमारने दिलेल्या रकमेचा वापर झाल्याचा दावा सुरुवातीला पोलिसांनी केला होता.
-एकीकडे हर्षकुमारच्या पैशांमधून विकत घेतलेली प्रत्येक संपत्ती जप्त केली जात असताना या जमिनीबाबत मात्र नंतर ठोस माहितीच समोर आली नाही.
-शिवाय, नागेश काम करत असलेल्या एजन्सीतील कोणाचीच अद्याप चौकशी झाली नाही. शिवाय जमिनीच्या अन्य खरेदीदारांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.

Web Title: Police investigation into Rs 21 crore scam gets stuck on 'old' issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.