पतीपीडित तक्रारदार महिलेला पोलीस निरीक्षकाचे आक्षेपार्ह मेसेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 15:43 IST2019-04-06T15:43:02+5:302019-04-06T15:43:29+5:30

पोलीस आयुक्तांकडून तक्रारीची गंभीर दखल, कसून चौकशी करणार

police inspector send offending messages to the victim in Aurangabad | पतीपीडित तक्रारदार महिलेला पोलीस निरीक्षकाचे आक्षेपार्ह मेसेज

पतीपीडित तक्रारदार महिलेला पोलीस निरीक्षकाचे आक्षेपार्ह मेसेज

औरंगाबाद : पतीविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर तिच्या मोबाईलवर पोलीस निरीक्षकांनीच वारंवार आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी रात्री समोर आला. ‘घाणेरडे मेसेज पाठवू नका’, असे सांगून महिलेने निरीक्षकाला व्हॉटस्अ‍ॅपवर ब्लॉक केले; मात्र त्यानंतरही त्यांनी गुरुवारी सकाळी टेक्स्ट मेसेज पाठविल्याने संतप्त महिलेने निरीक्षकांविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच, पोलीस निरीक्षक आजारी रजा टाकून ठाण्यातून गायब झाले.

हेमंत गिरमे, असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. परिसरातील एक विवाहिता घरगुती कारणावरून पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी काही दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गेली होती. ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरमे यांची त्यांनी भेट घेऊन तक्रारीचे स्वरूप सांगितले. पो. नि. गिरमे यांनी महिलेचा मोबाईल आणि तिच्या पतीचा मोबाईल नंबर घेतला होता. पतीला बोलावून समज देतो, तुम्हाला यापुढे तो त्रास देणार नाही, अशी ग्वाही गिरमे यांनी दिली होती.

बाळ घरी असल्याने त्या विवाहितेला लगेच घरी जावे लागले होते. नंतर पोलीस निरीक्षक गिरमे यांनी महिलेला फोन करून तक्रारीसंबंधी काही छायाचित्रे असतील तर त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पुरावा म्हणून महिलेने काही छायाचित्रे गिरमे यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविली होती. त्यानंतर गिरमे यांच्याकडून महिलेला सतत मेसेज येण्यास सुरुवात झाली. महिलेने गिरमे यांना फोन करून मेसेज पाठवू नका, असे स्पष्ट बजावले. यानंतरही गिरमे यांनी महिलेच्या व्हॉटस्अ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठविणे सुरूच ठेवले. एवढेच नव्हे, तर ते व्हिडिओ कॉल करू लागले. यामुळे महिलेने त्यांचा नंबर व्हॉट्सअ‍ॅपला ब्लॉक केला. व्हॉटस्अ‍ॅपवर ब्लॉक केल्यापासून गिरमे यांचे मेसेज येणे बंद झाले होते.

दरम्यान, ४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गिरमे यांनी महिलेच्या मोबाईलवर आक्षेपार्ह टेक्स मेसेज पाठविला. हा मेसेज वाचल्यानंतर महिलेने तिच्या पतीला गिरमेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. संतप्त महिलेने पतीसह जवाहरनगर पोलीस ठाण्यात गिरमेविरोधात तक्रार करण्यासाठी धाव घेतली; मात्र गिरमे पोलीस ठाण्यात आले नव्हते. 

महिलेची तक्रार प्राप्त, चौकशी सुरू -पोलीस आयुक्त
गिरमे यांनी मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याची तक्रार महिलेने नोंदविली आहे. मेसेजचे स्वरूप पाहून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवायचा; अथवा खात्यांतर्गत कारवाई करायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महिलेला आम्ही बोलावून घेत, त्यांची तक्रार जाणून घेतल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले. गिरमे हे आजारी रजेवर गेले आहेत. महिलेच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांना दिल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Web Title: police inspector send offending messages to the victim in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.