पोलिसांमुळे चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:02 AM2021-06-11T04:02:12+5:302021-06-11T04:02:12+5:30

वाळूज महानगर : मित्राच्या बहिणीसोबत असलेल्या एकतर्फी प्रेमातून तिच्या सहा वर्षीय चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न पोलिसांमुळे फसला. श्रींगोदाजवळील घारेगाव येथे ...

Police foiled an attempt to abduct Chimukalya | पोलिसांमुळे चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

पोलिसांमुळे चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

googlenewsNext

वाळूज महानगर : मित्राच्या बहिणीसोबत असलेल्या एकतर्फी प्रेमातून तिच्या सहा वर्षीय चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न पोलिसांमुळे फसला. श्रींगोदाजवळील घारेगाव येथे पोलिसांनी कारसह तरुणाला ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घारगाव येथे घडला. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिसांनी या तरुणाला वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले.

अहमदनगर जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधात उद्योगनगरीत आलेले एक कुटुंब बजाजनगरात किरायाच्या घरात राहते. या कुटुंबात पती-पत्नी व पप्पू (वय ६, नाव बदलले आहे) असे तिघेजण असून, दोघे पती-पत्नी कंपनीत काम करतात. दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पप्पूच्या चुलत मामाचा मित्र सागर गोरख आळेकर (२९, श्रीगोंदा) हा कार (एम.एच.४२, ए.एच.९६५५) घेऊन पप्पूच्या घरी आला होता. तो भावाचा मित्र असल्याने पप्पूच्या आई-वडिलांनी त्याचा पाहुणचार केला. पाहुणचारानंतर सागर कार घेऊन निघून गेला. मात्र, काही वेळाने त्याने पप्पूच्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधून तिला मोहटादेवी चौकात भेटण्यासाठी बोलावले. यानंतर पती-पत्नी मोहटादेवी चौकात सागरला भेटण्यासाठी गेले असता सागरने महिलेच्या पतीला माझे तुझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असून, मला तिला घेऊन जायचे आहे, असे सांगितले. यावेळी महिलेच्या पतीने सागरला समजावण्याचा प्रयत्न केला, तर पप्पूच्या आईने सागरसोबत जाण्यास नकार देत दोघेही पती-पत्नी घरी निघून गेले.

त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास सागर पुन्हा त्यांच्या घरी गेला. यावेळी त्याने पप्पूच्या आईला सोबत येण्याचा आग्रह केला. मात्र, तिने सोबत येण्यास नकार दिल्याने सागरने पप्पूला बळजबरीने कारमध्ये टाकून सुसाट निघून गेला. मुलाचे अपहरण झाल्याने घाबरलेल्या पती-पत्नीने दुचाकीवरून सागरच्या कारचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, रस्त्यात या दाम्पत्याने श्रीगोंदा येथे आपल्या नातेवाईकाला या प्रकरणाची माहिती दिली. नातेवाइकांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधत मदत मागितली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास श्रीगोंदाजवळील घारगाव येथे पोलिसांनी संशयित कार अडविली. यावेळी अपहरणकर्ता सागरच्या ताब्यातून पप्पूची सुटका करीत त्याला पालकांच्या स्वाधीन केले आणि सागरच्या मुसक्या आवळल्या. रात्री उशिरा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन पागोटे, पो.कॉ. दीपक मतलबे, पो.कॉ. गवळी यांनी सागर आळेकर याला ताब्यात घेऊन गुरुवारी सकाळी उद्योगनगरीत परतले. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक राहुल निर्वळ हे करीत आहेत.

फोटो क्रमांक- सागर आळेकर (आरोपी)

--------------------------

Web Title: Police foiled an attempt to abduct Chimukalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.