पोलिसांच्या श्वान पथकाची चोख कामगिरी; थेट रामराई दरोड्यातील आरोपींच्या घरापर्यंत पोहचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:58 IST2025-05-22T13:57:45+5:302025-05-22T13:58:06+5:30
पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले, तर श्वानपथकाच्या मदतीने दुसरा जेरबंद

पोलिसांच्या श्वान पथकाची चोख कामगिरी; थेट रामराई दरोड्यातील आरोपींच्या घरापर्यंत पोहचले
वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील रामराई येथे दि. १८ रोजी रात्री रामदास वाघमारे या शेतकऱ्याच्या घरावर सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील महिला आणि वृद्ध शेतकऱ्याला मारहाण केली होती. सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सतीश राजू ढोकळे (वय ३०, रा. अजवा नगर, वाळूज) याला घटना घडल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याची कसून चौकशी करण्यात आली.
दरम्यान, गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता तेथे सापडलेल्या चपलांच्या वासाचा माग काढत श्वानपथक थेट दुसऱ्या आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले. हा आरोपी म्हणजे जगदीश वसंत काळे (वय २०, रा. पत्रा कॉलनी, वाळूज) असून, श्वानपथक त्याच्या घरापर्यंत पोहोचले होते. तो तेथून फरार होता. मात्र, जगदीश पुन्हा पहाटे पत्रा कॉलनी येथे परतला असल्याची माहिती मिळताच पो.उ.नि. अजय शितोळे आणि पो.कॉ. विजय पिंपळे यांनी तत्काळ कारवाई करून त्यास पहाटे तीन वाजता ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दि.२५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.