'दोषारोप दाखल केल्याचे बक्षीस द्या'; ५ हजार रुपये लाच घेताना पोलीस हवालदार पकडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:13 IST2020-07-07T17:12:48+5:302020-07-07T17:13:13+5:30

काही दिवसापूर्वी  आरोपीविरुद्ध  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते

Police constable caught taking bribe of Rs 5,000 | 'दोषारोप दाखल केल्याचे बक्षीस द्या'; ५ हजार रुपये लाच घेताना पोलीस हवालदार पकडला 

'दोषारोप दाखल केल्याचे बक्षीस द्या'; ५ हजार रुपये लाच घेताना पोलीस हवालदार पकडला 

ठळक मुद्देदोषारोपपत्र दाखल करण्याची बक्षिसी म्हणून मागितली लाच

औरंगाबाद: आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे बक्षीस म्हणून तक्रारदार महिलेकडुन ५ हजार रुपये लाच घेताना उस्मानपुरा ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .

शिवाजी दामू गाडे असे अटकेतील पोलीस हवालदाराचे नाव आहे . याविषयी प्राप्त माहिती अशी की , तक्रारदार महिलेने पतीविरुध्द ट्रिपल तलाक दिल्याची फिर्याद उस्मानपुरा ठाण्यात नोंदविली होती या गुंह्याचा तपास हवालदार गाडे यांनी केला आणि काही दिवसापूर्वी  आरोपीविरुद्ध  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या कामाचे बक्षीस म्हणून आरोपी गाडेने  तक्रारदार महिलेकडे ५ हजार रुपये लाच मागितली . तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गाडेविरुध्द तक्रार नोंदविली.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक रेश्मा सौदागर आणि पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी उस्मानपुरा ठाण्यात सापळा रचला असता हवालदार गाडे याने पंचासमक्ष लाचेची मागणी करून तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले . यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी गाडेला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले .याविषयी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलीस नाईक विजय ब्राम्हंदे , रवींद्र अंबेकर , अनिल जाधव यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Police constable caught taking bribe of Rs 5,000