छत्रपती संभाजीनगरात रात्री पोलिसांची नाकाबंदी, उल्कानगरीत मात्र भरदिवसा घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:55 IST2025-06-17T12:47:07+5:302025-06-17T12:55:02+5:30
उल्कानगरीतील उच्चभ्रू वसाहतीत भरदिवसा फोडला फ्लॅट, १५ तोळे सोने व रोख लंपास

छत्रपती संभाजीनगरात रात्री पोलिसांची नाकाबंदी, उल्कानगरीत मात्र भरदिवसा घरफोडी
छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपासून रात्री पोलिसांकडून कसून गुन्हेगारांची तपासणी, नाकाबंदी केली जात आहे. चोरांनी मात्र दिवसाच शहरातील वावर वाढवून घरांना लक्ष्य करणे सुरू केल आहे. सोमवारी उल्कानगरी, विष्णुनगर मध्ये २ घरे तर जाधववाडीत एक टायरचे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला.
धनंजय जोशी हे कुटुंबासह सध्या रामचंद्रनगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या मूळ घराचे नूतनीकरण सुरू असल्याने ते काही महिन्यांपूर्वी या परिसरातील फ्लॅटमध्ये राहण्यास आले आहेत. कार्यालयीन कामानिमित्त धनंजय बाहेरगावी गेले होते. तर त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी त्यांची पत्नी दुपारी १२ वाजता त्यांच्या कार्यालयात गेली होती. तर, धनंजय यांची आई डबा देण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. याचदरम्यान चोरांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून फ्लॅटचे कुलूप तोडत प्रवेश केला.
दुपारीच कार्यभाग उरकून पसार
घाईत जाताना जोशी यांच्या कुटुंबीयांकडून लॅचलॉक व लोखंडी ग्रील दरवाजा लावणे राहून गेले. ही बाब चोरांच्या पथ्यावर पडली. चोरांनी मुख्य कुलूप तोडून घरात प्रवेश करत जवळपास १५ ते १८ तोळे सोने, रोख रक्कम चोरून नेली. जाताना अपार्टमेंटच्या दुसऱ्या गेटने बाहेर पडून ते मागील सोसायटीतून पसार झाले. पोलिसांच्या श्वानाने अर्ध्या रस्त्यापर्यंत त्यांचा माग काढला. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक अशाेक शरमाळे, उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे, चोरांनी जाताना कुलूप सोबत नेले.
विष्णुनगरमध्ये चोरांचा वावर
दुसरी चोरीची घटना विष्णुनगमधील शिवाजी वाकळे (३७) यांच्या घरी उघडकीस आली. २ जून रोजी वाकळे लग्नानिमित्त उदगिरला गेले होते. याच दरम्यान चाेरांनी त्यांचे घर फोडून जवळपास एक तोळ्याचे सोन्याचे दागिने, १८ तोळे चांदिचे दागिने, १५ हजार रोख रक्कम, एक मोबाइल चोरून नेला. सोमवारी दोन्ही घटनांत जवाहरनगर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
दुकान फोडून २ लाख रोख चोरीला
जाधववाडीत राहणाऱ्या कृष्णा पवार यांचे शुभश्री नावाने टायरचे दुकान आहे. शनिवारी रात्रीतून चोरांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत दुकानातील २ लाख ३ हजार ८०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. हर्सूल पोलिस या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.