छत्रपती संभाजीनगर : मैत्रीणीवर गोळीबार करुन पोलिसांसमक्ष जामिनावर सुटल्यावर आणखी चार मुलींना मारेन, त्यात काय एवढे', असे म्हणणाऱ्या गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज उर्फ तेजा (रा. किलेअर्क) याचा गुन्हे शाखेने चांगलाच माज उतरवला. बुधवारी त्याचे मुंंडन करुन शहरभर धिंड काढत कॅनॉट प्लेसला तर अक्षरश: गुडघ्यावर बसवले. केसात हात फिरवून धमकावणाऱ्या तेजाला लंगडताना पाहून नागरिकांनी पोलिसांच्या भुमिकेचे स्वागत केले.
११ ऑगस्ट रोजी तेजा २५ वर्षीय मैत्रिणीसोबत त्याच्या किल्लेअर्कच्या घरात होता. यावेळी अमली पदार्थांचा तस्कर, कुख्यात गुन्हेगार तालेब चाऊस, त्याचा मेव्हणा सोहेल करीम सय्यद ऊर्फ सोनू मनसे, त्याची आई रेश्मा अंजुम सय्यद यांच्या समोर रात्री ९ वाजता त्याने मैत्रिणीवर गोळी झाडली. जी तिच्या उजव्या हातात घुसली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप शिंदे यांनी त्याच्या घरात प्रवेश करत त्याच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी त्याला घटनास्थळी नेत असताना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्याने केसात हात फिरवत बाहेर आल्यावर आणखी चार मुलींना मारण्याची धमकी दिली होती.
बुधवारी दुपारी तेजाला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांना तेजावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्वप्रथम पोलिसांनी त्याचे मुंडन केले. त्यानंतर सहायक निरीक्षक लहाने, सुनिल लहाने, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी बुढ्ढीलेन, किलेअर्क परिसर व कॅनॉट प्लेसला धिंड काढली.
...लंगडत लपवलं तोंडबेगमपुऱ्याचे सहायक निरीक्षक सुनिल लहाने, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, अंमलदार राजेश यदमळ, शाम आडे, बाळू लहरे, नवनाथ खांडेकर, विजय निकम, सोमकांत भालेराव यांनी त्याला हातकडीसह तो राहत असलेला किलेअर्क परिसर, कॅनॉट प्लेस व बुढ्ढीलेनमध्ये धिंड काढली. यावेळी लंगडत तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होता.
१७ गंभीर गुन्ह्यांची नाेंद, तस्करीचे सिंडीकेट-२०१८ मध्ये पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेल्या तेजावर सात वर्षांत १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.-२०१९ मध्ये एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा हत्येचा प्रयत्न, त्यानंतर सिटी चौकात धाकदपटशाही.-२०२० मध्ये बेगमपुऱ्यात मध्ये कोरोना काळात गुन्हेगारी कृत्य.-२०२१ मध्ये सिटी चौक व बेगमपुऱ्यात मारहाण व धमकावणे.-२०२२ मध्ये हर्सूलमध्ये लुटमार, सायबरमध्ये ऑनलाईन विनयभंग, बेगमपुऱ्यात पुन्हा मारहाण, एमआयडीसी वाळूजमध्ये अपहरण, मृत्यूस कारणीभूत.-२०२३ मध्ये बेगमपुऱ्यात शस्त्रसाठा, हत्येच्या प्रयत्नाचे दोन स्वतंत्र गुन्हे.-२०२४ मध्ये सिडकोत बलात्कार, बेगमपुऱ्यात अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे.-२०२५मध्ये सिडको हत्येसह सोमवारच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा.